राजापूर : तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सोलगाव नं. २ येथील विद्यार्थ्यांनी शाळेबाहेरील एक तास या उपक्रमांतर्गत धनाजी बाणे यांच्या शेताला भेट दिली. यावेळी विद्यार्थ्यांनी हा एक तास शेतात राबून आगळावेगळा अनुभव घेतला. या विद्यार्थ्यांसमवेत शिक्षकही सहभागी झाले होते.उच्चशिक्षण आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आयुष्यात शेती शिक्षणही तेवढेच महत्त्वाचे असून, आपण कितीही प्रगतशील झालो तरी शेतीशिवाय पर्याय नाही.
त्यामुळे यावेळी मुलांनी निसर्गाचा आनंद घेण्याबरोबरच शेती म्हणजे काय? शेतकरी शेतात कसा राबतो, त्याचबरोबर नांगरणी, चिखलणी आणि लावणी कशी लावली जाते याचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांना मिळावा यासाठी हा उपक्रम सोलगाव शाळेतील उपक्रमशील शिक्षक दीपक धामापूरकर, मुख्याध्यापक आनंद साठे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रत्यक्ष शेतात जाऊन मुलांनी शेतीकामाचा आनंद अनुभवला.शेतातील सर्व कामांचे निरीक्षण करुन शेतीविषयक कामाची माहिती घेतली. भात रोपे काढणे, जोत टाकणे, लावणी करणे या उपक्रमात शाळेतील शिक्षिका प्रमिला ठाकर यांच्यासह रुपाली बाणे, नलिनी झोड्ये, प्रभावती बाणे, सविता परवडी, मनिषा परवडी, धनाजी बाणे, वैजयंती गावडे सुधाकर गावडे तसेच ग्रामस्थ सहभागी झाले होते.