सावर्डे : चिपळूण तालुक्यातील सह्याद्री शिक्षण संस्थेच्या सावर्डे येथील राजाभाऊ रेडीज अध्यापक विद्यालयात सन १९८३ ते १९८५च्या कालखंडात शिक्षण घेतल्यानंतर आज राज्यातील विविध ठिकाणी आपापल्या कर्तृत्त्वाचा ठसा उमटविणाऱ्या माजी विद्यार्थी - विद्यार्थिनींचे स्नेहसंमेलन पेढे येथील श्री परशुराम सानिध्य निसर्ग पर्यटन केंद्र येथे पार पडले.
कॉलेजमधून शिक्षण घेऊन बाहेर पडल्यानंतर ३४ वर्षांनी भेटणारे अनेकजण प्रथमदर्शनी एकमेकांना ओळखण्यातही कमी पडले. यावेळी भगवान परशुरामाच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून संमेलनाला सुरूवात झाली.
सर्वांची ओळखपरेड, कुटुंब परिचय, आपण केलेली प्रगती, सर्वांत आनंदाचा क्षण, दु:खदायक दिवस, सेवानिवृत्तीनंतरचा विचार, संमेलनाविषयी विषयी आपले मत याविषयी अनेकांनी आपली भूमिका मांडली. दीक्षा महाडिक हिने काढलेल्या रांगोळीने सर्वांची मने जिंकली, पुष्पगुच्छ देऊन तिचा सन्मान करण्यात आला.दुपार सत्रानंतर गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी सुहास पाध्ये यांनी आपल्या सुरेल आवाजाने सर्वांचे मनोरंजन केले, त्यांना सुनील पाध्ये यांनी तबलासाथ दिली. सायंकाळी सर्वांनी गोवळकोट धक्क्यावरून वाशिष्टी बॅकवॉटरमध्ये 'बोट सफारी आणि क्रोकोडाईल टुरिझम'चा आनंद घेतला.
संमेलन आयोजन समितीतील सदस्य विलास महाडिक यांच्या लग्नाचा २९वा वाढदिवसही सर्वांनी साजरा केला. संमेलनाच्या यशस्वीतेसाठी विलास महाडिक, जगन्नाथ सुर्वे, विश्वास बेलवलकर, नंदकुमार सकटे, भीमराव पाटील यांनी परिश्रम घेतले.