राजापूर : तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा सोलगाव क्रमांक २ मधील विद्यार्थ्यांनी एक तास शाळेबाहेर या उपक्रमांतर्गत शिक्षक दीपक धामापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली भातकापणीचा अनुभव घेतला तर भात गोळा करुन ते कसे झोडतात, याचे निरीक्षण करुन प्रत्यक्ष भात झोडण्याचा अनुभवही घेतला.शेती करताना सुरुवातीपासून करावी लागणारी कामे नांगरणी, पेरणी, लावणी, कापणी, भात गोळा करणे, भातझोडणीपर्यंतची सर्व कामे विद्यार्थ्यांनी यावेळी स्वत: अनुभवली. शेतकऱ्याने शेतात धान्य पिकवले तरंच आपल्याला धान्य मिळू शकते. शेतकऱ्यांना किती कष्ट सोसावे लागतात.
धान्याचा एक, एक कण कसा गोळा करावा लागतो. यासह आपण अन्न वाया घालवू नये, अशी शिकवण या उपक्रमातून विद्यार्थ्यांना मिळाली. तसेच गेले वर्षभर आपण या उपक्रमात सहभागी झाल्याबद्दलचे समाधान यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होते.या उपक्रमासाठी धनाजी बाणे, भूपेंद्र गोवळकर, महेश गावडे, चंद्रकांत गावडे, पुष्पमाला नांगरेकर यांच्यासह शाळेचे मुख्याध्यापक आनंद साठे, शुभदा पाळेकर, प्रमिला ठाकर यांचे सहकार्य लाभले. या उपक्रमातून शेतीचा आनंद विद्यार्थ्यांनी घेतला.