रत्नागिरी : शहर जागण्याआधीच शहराची साफसफाई करण्यासाठी पहाटे बाहेर पडणाऱ्या सफाई कामगारांचे काम खरोखरच कौतुकास्पद आहे. शहरातील नाले, गटारे, कचराकुंड्या, रस्ते तसेच शहर परिसर स्वच्छ करण्यात सफाई कामगार अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे त्यांच्या नवीन वर्षाची सुरूवात ही गोडकौतुक करून व्हावी म्हणून येथील आपुलकी सामाजिक संस्थेने रत्नागिरी शहरातील १५० सफाई कामगारांना एकत्र आणत मिठाईचे वाटप केले. अशा पध्दतीचा उपक्रम शहरात पहिल्यांदाच राबविण्यात आल्याने नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी संस्थेचे कौतुक केले आहे.शहराची स्वच्छता करण्यासाठी सफाई कामगारांना वेतन मिळते हे जरी खरे असले तरी हे काम करणे खूप अवघड आहे. शहरातील घाण या कामगारांकडून स्वच्छ केली जाते. शहराची स्वच्छता करणे व घरी जाणे यापलिकडे त्यांचे दुसरे आयुष्य नाही. कोणत्याही कार्यक्रमात त्यांचा सहभाग नसतो. मात्र, तरीही मनापासून संपूर्ण शहर स्वच्छ करण्याचे काम हे सर्व कामगार करतात. अशा या कामगारांचा नववर्षाचा पहिला दिवस आनंदमयी करावा या हेतूने आपुलकी सामाजिक संस्थेचे सौरभ मलुष्टे यांनी पुढाकार घेतला.
या कामगारांचे गोडकौतुक करण्यासाठी नगराध्यक्ष राहुल पंडित, जिल्हा पोलीस अधीक्षक प्रणय अशोक, उद्योजक किरण उर्फ भय्या सामंत, मुख्याधिकारी अरविंंद माळी, उपनगराध्यक्षा स्मितल पावसकर, पोलीस निरीक्षक अनिल विभुते, नगरसेवक बंड्या साळवी, शिल्पा सुर्वे, राजन शेट्ये, प्रशांत साळुंखे, विलास चाळके, बारक्या हळदणकर, भय्या भोंगले यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.अशा पद्धतीचा उपक्रम शहरात पहिल्यांदाच राबविण्यात आला, या सफाई कामगारांचा वेतनवाढीचा प्रश्न सोडवण्याची ग्वाही यानिमित्ताने आपण देत असल्याचे नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी सांगितले. तर जिल्हा पोलीस अधीक्षक प्रणय अशोक यांनीही सफाई कामगारांसाठीचा हा उपक्रम खरोखरच कौतुकास्पद असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आपुलकी संस्थेचे सौरभ मलुष्टे, प्रणय पोळेकर, जान्हवी पाटील यांच्यासह राजेंद्र चव्हाण, किशोर मोरे, राजेश शेळके, विजय पाडावे, अभिजित नांदगावकर, राजेश कळंबटे, बंटी पाथरे, सुदीप जाधव, प्रशांत हर्चेकर, नीलेश कदम, सचिन बोरकर, तन्मय दाते यांचे सहकार्य लाभले.सौरभ मलुष्टे यांचा पुढाकारआपुलकी या सामाजिक संस्थेचे वर्षभर समाजातील दुर्लक्षित, वंचित घटकांसाठी विविध उपक्रम सुरू असतात. यापूर्वी रत्नागिरीतील नगरपालिकेच्या २० होतकरू विद्यार्थ्यांना संस्थेकडून शैक्षणिक मदतही करण्यात आली असून, मनोरूग्ण, बंदिवान यांच्या पुनर्वसनासाठी मार्गदर्शक व विविध सण-उत्सवानुसार कार्यक्रम घेण्यात आले आहेत. यासाठी उद्योजक सौरभ मलुष्टे यांच्या पुढाकाराने आतापर्यंत अनेकांना मदत करण्यात आली आहे.