रत्नागिरी : भविष्यात जमीन खचण्याचे प्रकार घडून निर्माण होणार धोका टाळण्यासाठी संबंधित यंत्रणांनी या जागेचा सर्व्हे करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांनी दिल्या आहेत. जमीन खचलेल्या ठिकाणी टप्प्याटप्प्याने पीचिंग करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी ग्रामस्थांना सांगितले.मुसळधार पावसामुळे रत्नागिरी शहरानजीकच्या मिरजोळे मधलीवाडी-खालचापाट येथे जमीन खचण्याचे प्रकार घडत आहेत. याबाबत वृत्त प्रसिद्ध होताच जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांनी संबधित यंत्रणेसमवेत पाहणी केली.
वरिष्ठ भूवैज्ञानिक अधिकारी, अधीक्षक अभियंता, रत्नागिरी पाटबधारे कोकण मंडळ, कुवारबांव व अन्य संबधित यंत्रणा यांनी या प्रकरणाचा सर्व्हे करुन योग्य उपाययोजना करण्याच्या दृष्टिने नियोजन करावे, असेही यावेळी जिल्हाधिकारी यांनी सांगितले. तसेच जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांनी मिरजोळे गावातील ग्रामस्थांशीही चर्चा करुन घडल्या प्रकरणाची माहिती घेतली.यावेळी रत्नागिरी पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता दाभाडे, रत्नागिरीचे तहसीलदार मच्छिंद्र सुकटे, जिल्हा नियोजन अधिकारी सुभाष जुंजारे, वरिष्ठ भूवैज्ञानिक अधिकारी थोरात, मेराटाईम बोर्डचे मंजुळे, रत्नागिरी पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता नलावडे, मिरजोळेचे ग्रामस्थ गुरूनाथ भाटवडेकर उपस्थित होते.