रत्नागिरी : बनावट नोटा छापून त्या चलनात आणण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या सहाजणांना कर्नाटकमधील दांडेली पाेलिसांनी ताब्यात घेतले आहे़ या कारवाईत साडेचार लाख रुपयांच्या खऱ्या नोटा आणि ७२ लाख रुपये किमतीच्या बनावट नोटा जप्त केल्या. या बनावट नाेटा खरेदीसाठी गेलेल्या रत्नागिरीतील दाेघांना अटक करण्यात आली आहे़
बनावट नाेटांच्या देवाणघेवाणीची माहिती मिळताच एक विशेष पथक तयार करण्यात आले हाेते़ या पथकाने शिवाजी कांबळे याच्या घरावर छापा टाकून टाेळीला ताब्यात घेतले़ साडेचार लाख रुपयांच्या खऱ्या नोटांच्या बदल्यात ९ लाख रुपये बनावट नोटा देण्याचा व्यवहार सुरू असताना दांडेली पाेलिसांनी ही कारवाई केली़ ताब्यात घेतलेल्या व्यक्तींमध्ये महाराष्ट्र, बेळगाव आणि दांडेली येथील संशयितांचा समावेश आहे. या कारवाईमध्ये पाेलिसांनी सुरुवातीला शब्बीर कुट्टी (४५) आणि शिवाजी एस़ कांबळे (५२, दोघेही रा. दांडेली, कर्नाटक) यांना ताब्यात घेतले हाेते़ त्यानंतर किरण एम़ देसाई (४०), गिरीश एन पुजारी (४२, दोघेही रा. रत्नागिरी), अमर एम़ नाईक (३०, रा. किणये, कर्नाटक) सागर पी़ कुण्णूरकर (२८, रा. चव्हाण गल्ली, बेळगाव) या चाैघांना अटक केली़ हे मूळ बेळगावचे राहणारे असून, हे चाैघे शब्बीर आणि शिवाजी कांबळे यांच्याकडून नाेटा खरेदी करत हाेते़
पाेलिसांनी या गुन्ह्यासाठी वापरलेल्या दाेन कारही जप्त केल्या आहेत़ या प्रकरणातील शब्बीर कुटी व शिवाजी कांबळे या दाेघांना दांडेली न्यायालयाने १४ दिवसांची पाेलीस काेठडी सुनावली आहे़ तर उर्वरित चारजणांना हयाळा न्यायालयाने न्यायालयीन काेठडी सुनावली आहे़
------------------------------------
कर्नाटक येथील दांडेली पाेलिसांनी बनावट नाेटांच्या व्यवहारासाठी वापरण्यात आलेल्या दाेन कार ताब्यात घेण्यात आल्या आहेत़