देवरुख : इंजिनीअरची पदवी असताना मनासारखी नोकरी मिळत नव्हती. दोन-चार ठिकाणी नोकरी केल्यानंतर एका नामांकीत कंपनीत त्याने मुलाखत दिली होती. त्यात तो उत्तीर्णही झाला. कामावर रूजू होण्यासही सांगितले गेले.परंतु नियतीच्या मनात त्याला नवी नोकरी मिळू द्यायची नव्हती. हा दुर्दैवी प्रकार निवेबुद्रुक येथील रणजीत गुरुनाथ कुवळेकर या युवकाच्या बाबतीत घडला आहे. रणजीतचा वाडा (पालघर) येथे पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.निवेबुद्रुक येथील रणजीत कुवळेकर (२६) याने नजीकच्या आंबव अभियांत्रिकी महाविद्यालयात इंजिनीअरिंगची पदवी घेतल्यानंतर त्याची नोकरीसाठी भटकंती सुरु झाली. दोन-चार ठिकाणी त्याला नोकरी मिळालीही. मात्र ती मनासारखी नव्हती. त्यामुळे तो नव्या नोकरीच्या शोधात होता. गेली दीड वर्षे तो पालघर जिल्ह्यातील वाडा येथे एका कंपनीत कामाला होता. मात्र, ही नोकरी मनासारखी नसल्याने त्याने ४ महिन्यांपूर्वी ही नोकरी सोडली होती. पगारात तफावत असल्याने त्याने हा निर्णय घेतला होता.आठ दिवसांपूर्वी त्याने वाडा येथीलच एका नामांकीत कंपनीत मुलाखत दिली होती. या मुलाखतीमध्ये तो उत्तीर्ण झाला. पगारही चांगला असल्याने त्याने ही नोकरी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार तो ३ सप्टेंबरला हजर होणार होता. मात्र, त्यापूर्वीच नियतीने त्याच्यावर झडप घातली. शुक्रवारी (३१ आॅगस्ट) तो राहात असलेल्या खोलीनजीक एक बंधारा होता. या बंधाऱ्यात आंघोळीसाठी रणजीत गेला होता. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला.
स्थानिक ग्रामस्थांनी त्याचा मृतदेह पाण्याबाहेर काढला. पालघर पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यापूर्वीच त्याला काळाने हिरावून नेले. आई-वडिलांचा एकुलता एक असलेल्या रणजीतच्या जाण्याने कुटुंबियांना धक्का बसला. रविवारी त्याच्यावर निवेबुद्रुक येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.वडिलांशी संभाषणशुक्रवारी ही घटना घडण्याच्या १५ मिनिटे अगोदर रणजीतने आपल्या गावी असलेल्या वडिलांशी मोबईलव्दारे संपर्क साधून आपली नोकरी निश्चित झाली असून, मी सोमवारी हजर होत आहे, असे सांगितले. दहा मिनिटे तो आपल्या वडिलांशी बोलत होता.