रत्नागिरी ,दि. ३० : नांदेड येथे झालेल्या दोन दिवसीय चौथ्या राष्ट्रीय जलतरण अंजिक्यपद स्पर्धेत रत्नागिरीच्या शंकरराव मिलके, डॉ. निशिगंधा पोंक्षे, अश्विनी नलावडे तीन स्पर्धकांनी नेत्रदीपक कामगिरी करत २० सुवर्णपदक आणि दोन रौप्य पदकांची कमाई केली आहे.
शंकरराव मिलके तसेच डॉ. निशिगंधा पोंक्षे यांनी अनेक राज्यस्तरीय तसेच राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत भाग घेऊन रत्नागिरीला अनेक पदक मिळवून दिली आहेत. विविध स्पर्धांमध्ये या दोघांचा सहभाग सातत्याने असतो. यावेळीही या दोघांनी महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करीत या स्पर्धेत सहभाग नोंदवून उल्लेखनीय यश मिळविले आहे.
मास्टर्स अॅक्वॅटिक फेडरेशन आॅफ इंडिया यांच्या वतीने २८ आणि २९ आॅक्टोबर या दोन दिवसांच्या कालावधीत या स्पर्धा नांदेड येथे झाल्या. यात रत्नागिरीतून शंकरराव मिलके, माधवी साठे (चिपळूण) यांनी ७५ वर्षावरील गटात, रत्नागिरीच्या डॉ. निशिगंधा पोंक्षे ५० वर्षावरील गटात आणि अश्विनी नलावडे ४० वर्षावरील गटात सहभागी झाल्या होत्या. त्यांच्यासोबत श्रीराम सनये, अदित्य जैस्वाल, संजय नलावडे आदी प्रशिक्षित जलतरण पटूही सहभागी झाले होते.
या स्पर्धेतही या जलतरणपटूनी रत्नागिरीचा वरचष्मा कायम राखला. उत्कृष्ट खेळी करत ७५ वर्षावरील गटात शंकरराव मिलके यांनी दोन सुवर्ण तर दोन रौप्य पदके पटकावली. तर चिपळूणच्या माधवी साठे यांनीही सहा सुवर्ण पदके पटकावली. ५० वर्षावरील गटात डॉ.निशिगंधा पोंक्षे आणि ४० वर्षावरील गटात अश्विनी नलावडे यांनी ६ सुवर्ण पदके पटकावली.