रत्नागिरी : लखनौ अधिवेशनात टिळकच आमचे खरे नेते आहेत, असा जनक्षोभ वाढला. जनतेकडून असा मान अखंड भारतात फक्त लोकमान्यांना मिळाला. लखनौ अधिवेशनात त्यांनी स्वराज्य, माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी सिंहगर्जना केली, सर्वसामान्यांच्या आदरातूनच टिळक लोकमान्य झाले, असे प्रतिपादन राष्ट्रीय कीर्तनकार चारदत्त आफळेबुवा यांनी केले.कीर्तनसंध्या आयोजित कीर्तन महोत्सवाच्या पाचव्या व शेवटच्या कीर्तनात आफळेबुवा बोलत होते. रत्नागिरीकरांनी या कीर्तनाला प्रचंड गर्दी केली होती.
राजद्र्रोहाच्या आरोपाखाली टिळकांना मंडालेच्या तुरूंगात जावे लागले. दरम्यान इंग्रजांविरोधात प्रचंड असंतोष वाढला. टिळक सुटल्यानंतर लखनौमध्ये काँग्रेसच्या अधिवेशनात टिळकच आमचे खरे नेते आहेत, असा जनक्षोभ वाढला. लखनौला जाण्यासाठी प्रत्येक स्थानकावर आगगाडी थांबवून लोकांनी टिळकांना अभिवादन केले. टिळक मोटारीत बसले तर लोकांनी सर्व टायरची हवा काढली आणि जनतेने त्यांना बग्गीमध्ये बसण्यास सांगितले. अखेर बग्गीचे घोडे काढून कार्यकर्त्यांनी स्वत: बग्गी ओढली.
दक्षिण आफ्रिकेतील लढा संपवून मोहनदास गांधी भारतात परतले होते. पहिल्या महायुध्दात इंग्रजांना विनाअट हिंदुस्थानी सैनिक मदत करतील, असा प्रस्ताव काँग्रेसने केला. त्यामुळे इंग्रज भारावून आपल्याला साम्राज्यातील सुराज्य देतील, असा अंदाज होता. मात्र, इंग्रजांकडून काहीही मिळणार नाही, हे लोकमान्यांना चांगलेच माहीत होते. त्यामुळे लोकमान्यांनी या प्रस्तावाला विरोध दर्शविला होता.भारताचा विजय नजीक असला की दुर्दैवाने आपला नेता जातो. इतिहास काळापासून हे आतापर्यंत दिसून आले आहे. स्वा. सावरकरांनी हिंदुस्थान जगाचे नेतृत्व करणारे राष्ट्र बनेल, अशी भविष्यवाणी केली होती. त्या दिशेने भारताचे प्रवास सुरू झाला आहे.
हिंदुस्थानच्या नेत्याला सर्व हिंदुंनी जातपात न बघता पक्ष न बघता हिंदुस्थानी म्हणून पाठबळ द्या, असे भावनिक आवाहन बुवांनी केले. तिसऱ्या महायुध्दात हिंदुस्थान वाचला पाहिजे म्हणून साऱ्यांनी व्यायाम, योगसाधना आणि बलवान व्हावे, अशी सूचनाही त्यांनी केली.
राजा केळकर, हेरंब जोगळेकर, प्रथमेश तारळकर, उदय गोखले, मधुसूदन लेले, आदिती चक्रदेव, महेश सरदेसाई, आदित्य पोंक्षे यांनी संगीतसाथ केली तर निबंध कानिटकर यांनी निवेदन केले. आफळेबुवांच्या संकेतस्थळाचा प्रोमो दाखविण्यात आला. संकेत सरदेसाई यांनी ही वेबसाईट डिझाईन केली आहे.अखिल भारतीय कीर्तन संमेलन रत्नागिरीतदिल्लीच्या नाटक अकादमीवर आफळेबुवा महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करतात. त्यामुळे अखिल भारतीय स्तरावरील कीर्तन संमेलन घेण्याचा प्रस्ताव आल्यावर बुवांनी पुण्या-मुंबईऐवजी रत्नागिरीच्या कीर्तनसंध्या परिवाराच्या खांद्यावर ही जबाबदारी टाकण्याचे ठरवले.
कीर्तनसंध्या गेली सात वर्षे भव्यदिव्य स्वरूपात कीर्तन महोत्सवाचे यशस्वी नियोजन करत आहे. त्यामुळे बुवांनी कीर्तनसंध्याच्या कार्यकर्त्यांचे कौतुक करून अ. भा. संमेलन रत्नागिरीत घेऊ, असे दिल्लीमध्ये सांगितले. या संमेलनात बंगाली, आसामी, तमिळ अशा विविध भारतीय भाषांतील कीर्तनकारांची कीर्तने ऐकण्याची पर्वणी रत्नागिरीकरांना मिळेल, असे जाहीर केले.