देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील तेर्ये बुरंबी गावात एका पिसाळलेला श्वानाने पाचजणांना चावा घेऊन जखमी केल्याची घटना रविवारी घडली. या श्वानाचा बंदोबस्त करण्याची मोहिम तेर्ये ग्रामपंचायतच्यावतीने राबविली जात आहे.तेर्ये बुरंबी येथील हा शिकारी श्वान होता. कातकरी समाजातील एका कुटुंबाने पाळला होता. हा श्वान आता पिसाळला आहे. तेर्ये मधलीवाडीतील वेदा प्रमोद भरवणे (७) ही अंगणात खेळत असताना तिच्या पायाला व कंबरेला दोन ठिकाणी चावा घेऊन नखाने ओरबाडून जखमी केले तर बाब्या मुंगु गुरव (७५, टाकेवाडी), निशा राजू पंडीत (२५, बुरंबी) याबरोबरच ग्रामस्थ धावडे (६५, मुचरी धावडेवाडी) यांना चावा घेउन जखमी केले आहे.या चार जणाना बुरंबी प्राथमिक आरोग्य केद्र्रात प्राथमिक उपचार आणि पहिला डोस देऊन रत्नागिरीच्या जिल्हा शासकिय रुग्णालयात पाठवण्यात आले आणि अत्यावश्यक असलेला इनिनोग्लोबीन लसीचा डोस देण्यात आला. त्यांना उर्वरीत चार डोस बुरंबी आरोग्य केंद्रात देण्यात येणार असल्याची महिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. व्ही. आर. रायभोळे यांनी दिली.
याच श्वानाने कुळयेवाशीतील सखाराम सदाशिव गावडे (६५ ) यांनादेखील चावा घेउन जखमी केले. त्यांना संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. संगमेश्वर येथील अन्कुर प्रमोद कास्टे यांना त्यांच्याच घरातील श्वानाने चावा घेतला. त्याच्यावर संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले.
तेर्ये गावातील पिसाळलेल्या या शिकारी श्वानाचा ग्रामपंचायतीच्यावतीने बंदोबस्त करण्यात येत आहे. तरुणांची एक टोळी या श्वानाला मारण्यासाठी रात्रभर गस्त घालत आहेत. दरम्यान संगमेश्वर, देवरुख शहरासह साडवली परिसरात भटक्या श्वानांची संख्या वाढल्याचे दिसुन येत आहे.