चिपळूण : रत्नागिरी जिल्हा प्रशासन व महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे चिपळूण येथील पवन तलावाच्या मैदानावर रत्नागिरी पर्यटन महोत्सव गेले तीन दिवस सुरू आहे. आज, सोमवारी सायंकाळी पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्या उपस्थितीत महोत्सवाचा सांगता समारंभ होणार आहे. त्यानंतर मराठीतील आघाडीचे गायक सुदेश भोसले यांची ‘अमिताभ और मैं’ ही सुरेल मैफल रंगणार आहे. रत्नागिरी पर्यटन महोत्सवामुळे चिपळूण परिसर पर्यटकांनी फुलला आहे. क्रोकोडाईल सफारी, वॉटर स्पोर्टस्, रिव्हर क्रॉसिंग, बंपर राईड, स्कूलबा डायव्हिंग, अॅरो मॉडलिंग या विशेष कार्यक्रमांनी या महोत्सवात रंगत आणली आहे. हजारो पर्यटक या महोत्सवाचा आस्वाद घेत आहेत. या महोत्सवाचा सांगता समारंभ आज सायंकाळी सहा वाजता पर्यावरणमंत्री रामदास कदम, पालकमंत्री रवींद्र वायकर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष तुकाराम गोलमडे, महोत्सव समिती अध्यक्ष आमदार सदानंद चव्हाण यांच्या उपस्थितीत होणार आहे. उपविभागीय अधिकारी रवींद्र हजारे व तहसीलदार वृषाली पाटील या महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी मेहनत घेत आहेत. आज सकाळी नऊ वाजता महाआरोग्य शिबिर, दुपारी तीन वाजता पुष्परचना व फळभाज्यांवरील कोरीव काम स्पर्धेचे उद्घाटन नगराध्यक्षा सावित्री होमकळस यांच्या हस्ते होईल. सायंकाळी चार वाजता कृषी पर्यटन या विषयावर चंद्रशेखर भडसावळे, संजीव अणेराव यांचे व्याख्यान होईल. सायंकाळी पाच वाजता नितीन बानुगडे पाटील यांचे शिवचरित्रावर व्याख्यान होईल. सायंकाळी सहा वाजता सांगता समारंभ होणार आहे. (प्रतिनिधी)
रत्नागिरी पर्यटन महोत्सवाची आज सांगता
By admin | Published: May 09, 2016 12:19 AM