- अरुण आडिवरेकर
रत्नागिरी : काेकण रेल्वे मार्गावरील बदलेल्या पावसाळी वेळापत्रकाचा फटका शनिवारी (१० जून) जनशताब्दी एक्स्प्रेस गाडीतील प्रवाशांना बसला. जुन्या वेळेनुसार प्रवासी रेल्वे स्थानकात आल्यानंतर गाडी नवीन वेळेनुसार निघून गेल्याचे प्रवाशांना कळले. त्यानंतर प्रवाशांनी रत्नागिरी रेल्वे स्थानकातील तिकीटघराकडे माेर्चा वळवून गाेंधळ घातला.
मडगावहून मुंबईकडे जाणारी जनशताब्दी एक्स्प्रेसची पावसाळ्यापूर्वीची वेळ सायंकाळी ६:१० अशी आहे. मात्र, पावसाळी वेळापत्रकानुसार ही गाडी आता ४:५५ वाजता रत्नागिरी रेल्वेस्थानकातून सुटली. ही गाडी मुंबईकडे रवाना झाल्यावर तिकिटावरील जुन्या वेळेनुसार प्रवासी रेल्वेस्थानकात दाखल झाले. मात्र, गाडी रवाना झाल्याचे कळताच प्रवाशांनी गाेंधळ घातला.
प्रवाशांनी गाडीचे आरक्षण करताना त्या तिकिटावर पावसाळी वेळापत्रकानुसार वेळ नव्हती. या गोंधळात पन्नासहून अधिक प्रवाशांची गाडी चुकली. त्या प्रवाशांनी रेल्वेस्थानकावरील तिकीट घराकडे धाव घेतली. तेथील अधिकाऱ्यांनीही तिकिटावरील वेळेची नोंद ही वरिष्ठपातळीवरून होत असल्याचे सांगत प्रवाशांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला.