रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील पोलीस निरीक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. महिनाभरापूर्वीची जिल्ह्यातील काही पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या.
मात्र त्या तात्पुरत्या स्वरुपातील होत्या. रत्नागिरीत शिवसेना व महाराष्ट्र स्वाभिमान पक्षामध्ये एकिकडे राजकीय चकमक सुरू असतानाच पोलीस निरीक्षकांच्या झालेल्या बदल्यांमुळे राजकीय निरीक्षकांच्या भूवया उंचावल्या आहेत.रत्नागिरी शहर पोलीस निरीक्षक म्हणून मालवणहून बदली झालेल्या अरविंद बोडके यांनी महिनाभरापूर्वीच पदभार स्वीकारला होता. त्यांची बदली आता चिपळुण तालुक्यातील सावर्डे येथे करण्यात आली आहे.रत्नागिरी शहर पोलीस निरीक्षक म्हणून हेमंतकुमार शहा यांची नियुक्ती झाली असून त्यांनी शुक्रवारी पदभार स्वीकारला. जयगडचे पोलीस निरीक्षक इंद्रजीत काटकर यांची बदली गुहागर येथे झाली आहे. जयगड पोलीस स्थानकात मिलिंद हिवाळे यांची नियुक्ती झाली आहे. पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांची बदली चिपळुण येथे झाली आहे.