देवरूख : देवरूख आठवडा बाजारात होणाऱ्या चोऱ्यांमध्ये वाढ होत आहे. २१ रोजी आठवडा बाजारात खरेदीसाठी आलेल्या दोन तरूणांचे मोबाईल चोरीला गेल्याची खळबळजनक घटना घडली आहे. याप्रकरणी हैद्राबाद येथील एका महिलेवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आले आहे.दर रविवारी देवरूख खालची आळी परिसरात आठवडा बाजार भरतो. घाटमाथ्यावरून व्यापारी येथे हजेरी लावतात. देवरूख हे तालुक्याचे मध्यवर्ती ठीकाण असल्याने तालुक्याच्या कानाकोपऱ्यांतून ग्रामस्थांची खरेदीसाठी झुंबड उडते. या गर्दीचा फायदा चोरटे उचलत असून पाकीट व मोबाईल लांबवणे असे प्रकार घडतात. रविवारी २ मोबाईल चोरट्यांनी लंपास केल्याची बाब पुढे आली आहे. हा प्रकार दुपारी १.३० ते २ वाजण्याच्या दरम्यान घडला.याबाबत राकेश युवराज महिरे (नंदुरबार) व शैलेश सिध्दार्थ गमरे (तेऱ्यये बुरंबी) यांनी देवरूख पोलीस ठाण्यात मोबाईल चोरीबाबत खबर दिली आहे. राकेश महिरे यांचा २० हजार रूपये किमतीचा सॅमसंग कंपनीचा तर शैलेश गमरे याचा ८ हजार रूपये किमतीचा मोबाईल चोरीला गेल्याचे देवरूख पोलीस ठाण्यात दिलेल्या फीर्यादीत नमूद केले आहे.
दिलेल्या फीर्यादीवरून चोरट्यावर भारतीय दंड विधान कलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत हैद्राबाद येथील तनक्का व्येंकटेश (३२) या महिलेला संशयित म्हणून पोलीसांनी ताब्यात घेत अटक केली आहे.
एका अल्पवयीन युवकालाही ताब्यात घेतल्याचे समजते. याबाबत अधिक तपास हेड काँन्स्टेबल पी. डी. कदम करीत आहेत. आठवडा बाजारात खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांनी सजग राहणे गरजेचे आहे. तसेच मौल्यवान वस्तु बाजारात घालून येवू नये असे आवाहन पोलीस यंत्रणेमार्फ त करण्यात आले आहे.