लांजा : ऐन दिवाळी सणाच्या सुट्टीत अज्ञात चोरट्यांनी एका रात्रीत भांबेड व प्रभानवल्ली येथील बँक, दोन दुकाने फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन अट्टल चोरट्यांना शनिवारी रात्री वैभववाडी पोलिसांनी नाकाबंदी केली असता अटक करण्यात आली आहे तर दोन साथीदार फरार होण्यात यशस्वी झाले आहेत.बुधवारी दि. ७ नोव्हेंबर रोजीच्या एका रात्रीत भांबेड येथे असलेल्या रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा भांबेड या बँकेत चोरीच्या उद्देशाने दरवाजाचा कडी-कोयंडा उचकटून बँकेत प्रवेश करण्यात अज्ञात चोरटे यशस्वी झाले. त्यानंतर त्यांनी लॉकर रुमकडे आपला मोर्चा वळवला. लॉकर रुमचा दरवाजा उघडून आतमध्ये प्रवेश केला असता रात्री १.४५ वाजता मोठमोठ्याने सायरन वाजू लागल्याने धोका ओळखून अज्ञात चोरट्यांनी येथून पलायन केले.बँकेत चोरीचा प्रयत्न फसल्याने चोरट्यांनी बाजारपेठ असलेल्या सारीम इक्बाल वाघू यांच्या वेल्डिंग दुकानाचे शटर तोडून गॅस कटर मशीन चोरण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्या दुकानात सिलेंडर नसल्याने ते हे गॅस कटर मशीन घेऊन गेले नाहीत. बँकनंतर वेल्डिंग दुकान फोडण्याचा प्रयत्न अपयशी ठरलेल्या चोरट्यांनी आपला मोर्चा प्रभानवल्ली येथे वळवून शशिकांत बाबल्या चव्हाण यांचे दुकान फोडले.
या दुकानातील तीन हजाराची चिल्लर घेऊन जाण्यात ते यशस्वी झाले होते. परतीच्या प्रवासाला निघता निघता उमेश तुकाराम बेर्डे यांच्या दुचाकीमधील पेट्रोल चोरुन परार झाले होते. या अज्ञात चोरट्यांच्या मागावर लांजा पोलीस होतेच. लांजा येथे चोरीचा प्रयत्न केल्यानंतर त्यांच्या हाती काहीच लागले नव्हते. त्यामुळे या चार चोरट्यांनी आपला मोर्चा सिंधुदुर्ग जिल्ह्यात वळवला होता.शनिवारी रात्री वैभववाडी पोलिसांनी रात्री नाकाबंदी केली असता शरद सर्जेराव काळे (२८, करविर), विशाल भिमराव कांबळे (२८, पासार्डे, करवीर) या दोघांना संशयित म्हणून अटक करून त्यांची चौकशी केली असता लांजा भांबेड येथे चोरी केल्याची कबुली दिली. या चोरीमध्ये आणखीन दोन साथीदार होते.
सचिन महादेव चौगुले (२९, पासार्डे-करवीर), बाबूराव मारुती पाटील (३१, राधानगरी) या चौघांनी भांबेड, प्रभानवल्ली येथे चोरीचा प्रयत्न केला आहे. सध्या हे चोरटे वैभववाडी पोलिसांच्या ताब्यात असून लवकरच हे अट्टल चोरटे लांजा पोलिस आपल्या ताब्यात घेणार आहेत.