भोस्ते : बेकायदेशीररित्या वाळू वाहतूक करणारे ६ डंपर खेडचे प्रांताधिकारी अविशकुमार सोनाने आणि तहसीलदार अमोल कदम यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागाचे मंडल अधिकारी व तलाठी यांच्या पथकाने पकडून ते महाडनाका येथील मैदानावर ठेवले होते. या कारवाईमुळे बेकायदशीररित्या वाळूची वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. प्रत्येकी ५० हजारांची दंडात्मक कारवाई संबंधित डंपर मालकांवर केल्याचे वृत्त आहे.यावेळी जप्त केलेल्या डंपरमध्ये (एमएच ०८ / डब्ल्यू ८१८५), (एमएच ०८ / डब्ल्यू ८४१७), (एमएच ०८ / डब्ल्यू ८२०५), (एमएच ०८ / डब्ल्यू ३५२५), (एमएच ०८ / डब्ल्यूएपी ०६५८), (एमएच ०८ / डब्ल्यू ८४१४) यांचा समावेश आहे. वाळूची वाहतूक करणाऱ्या या डंपरवर कारवाई करताना आवश्यक त्या रॉयल्टी तसेच अन्य महत्त्वाच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात आली.
या तपासणीदरम्यान दोन डंपर चालकांकडे ही कागदपत्रं आढळून आली नाहीत. त्यामुळे या डंपर चालकांवर प्रत्येकी ५० हजारांची दंडात्मक कारवाई करण्यात आली तर उर्वरित वाळूचे डंपर सोडण्यात आल्याची माहिती महसूल विभागातील सुत्रांकडून मिळाली.
या कारवाईबाबत प्रांताधिकारी सोनाने यांच्याशी संपर्क साधला असता, ते स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कोकण मतदारसंघ निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी असल्याने विस्तृत माहिती मिळू शकली नाही.दरम्यान, खेड शहरात बेकादेशीर वाळूची वाहतूक ही कुंभारवाड्याकडून शासकीय विश्रामगृहाच्या पाठीमागून पालेकर यांच्या दवाखान्याजवळून महाडनाकामार्गे होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. याकडे प्रांताधिकारी व तहसीलदारांनी लक्ष दिल्यास या चोरट्या पध्दतीने होणाऱ्या वाहतुकीला आळा बसेल, असे मत खेडमधील जागरुक नागरिकांनी व्यक्त केले आहे.