रत्नागिरी : समाेरुन येणाऱ्या वाहनाने हुलकावणी दिल्याने एसटी बस रस्त्याच्या बाजूला कलंडल्याने अपघात झाला. हा अपघात आज, साेमवारी (दि. १८) सकाळच्या दरम्यान हातखंबा (ता. रत्नागिरी) येथे झाला. याच मार्गावरुन महाड येथे दाैऱ्यावर जाणारे पालकमंत्री उदय सामंत यांच्या समाेरच हा अपघात झाल्याने त्यांनी तात्काळ थांबून मदत कार्य केले.रत्नागिरी-महाड-वसई (एमएच १४, बीटी २४९८) ही गाडी साेमवारी सकाळी रत्नागिरीहून महाडकडे जाण्यासाठी निघाली हाेती. या गाडीमधून २१ प्रवासी प्रवास करत हाेते. गाडी महामार्गावरील हातखंबा येथे आली असता समाेरुन येणाऱ्या वाहनाने बसला हूल दिली. त्यामुळे चालकाने बस बाजूला घेण्याचा प्रयत्न केला असता गाडी रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या चरात कलंडली. या चरातच गाडी अडकून राहिल्याने सुदैवाने माेठी दुर्घटना टळली. मात्र, या अपघातात दाेन महिला प्रवाशांना किरकाेळ दुखापत झाली आहे.
राज्याचे उद्योमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत हे साेमवारी सकाळी रत्नागिरीतून महाडच्या दौऱ्यावर निघाले हाेते. त्यांच्या गाडीच्या समोरच रत्नागिरी - वसई गाडीचा अपघात झाला. अपघात झाल्याचे पाहताच त्यांनी आपली गाडी थांबवली आणि स्वतः गाडीतून खाली उतरून त्यांनी स्वतःच्या कोणत्याही सुरक्षेचा विचार न करता मदत कार्याला सुरुवात केली. त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना घेऊन एसटी बसमध्ये अडकलेल्या २१ प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्याचे काम केले. त्यानंतर महाडचा दौरा असतानाही अपघातातातील जखमी झालेल्या प्रवाशांना त्यांनी आपल्या सुरक्षा रक्षकांच्या गाडीतून रुग्णालयात उपचारासाठी पाठवले.
या अपघाताची माहिती मिळताच हातखंबा येथील वाहतूक पाेलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अपघाताची माहिती घेऊन पंचनामा केला.