रत्नागिरी : स्थानिकांवर अन्याय करून स्वत:चे मालवाहतूक ट्रक घुसविण्याचा प्रयत्न करणाऱ्या क्रिएटिव्ह ग्रेन कंपनीला जिल्हा मोटर मालक संघटनेने अद्दल घडविली असून, परजिल्ह्यातील धान्य वाहतूकदारांना सोमवारी परत पाठविण्यात आले.वर्षानुवर्षे स्थानिक ट्रकचालक रास्त दराची धान्य वाहतूक करीत असताना शासकीय धान्य वाहतूक वितरणाचे काम घेतलेल्या क्रिएटिव्ह ग्रेन कंपनीने जिल्ह्यात स्वत:चे मालवाहतूक ट्रक घुसविण्याचा प्रयत्न केला. परंतु याची माहिती मिळताच रत्नसिंधु टेम्पो, डंपर चालक, मालक संघटना आणि जिल्हा मोटर मालक संघटनेने आक्रमक होत सांगलीतून आलेले ट्रक महामार्गावरच रोखून धरले आणि त्यांना माघारी परतवले.जिल्ह्यातील धान्य वाहतूक गेली अनेक वर्षे स्थानिक ट्रक मालकांमार्फत केली जात होती. या वाहतुकीवर रत्नागिरीतील अनेक स्थानिक कुटुंब अवलंबून आहेत. मात्र, राज्य सरकारच्या पुरवठा विभागाने यावेळी राज्यस्तरावर धान्य वितरणाचे टेंडर काढले. त्याचा ठेका सांगली येथील रमेश शहा यांनी घेतला. स्थानिक ट्रकचालकांना बरोबर घेण्याचे त्यांनी मान्य केले होते. परंतु कमी दराने निविदा भरल्याने सध्याच्या प्रचलित दरापेक्षा कमी दराने धान्य वाहतूक करण्याची अट शहा यांनी स्थानिक ट्रकचालकांना घातली होती.सध्या जिल्हा प्रशासनामार्फत थेट धान्य वाहतूक सुरु आहे. पंधरा दिवसांनी ट्रक चालकांना भाडे देण्यात येते. सध्या जिल्हा प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या वाहतूक भाड्याएवढेच भाडे द्यावे, अशी रास्त मागणी वाहतूक संघटनांनी रमेश शहा यांच्याकडे केली होती. परंतु शहा यांनी नकार दिला, तर जिल्हा प्रशासनाने स्थानिक ट्रक चालकांमार्फत वाहतूक सुरू ठेवली होती. मात्र, गणेशोत्सवानंतर ठेकेदार कंपनीकडून धान्य वितरण सुरू होणार आहे.
यासाठी शहा यांनी सोमवारी सांगलीतील चार ट्रक धान्य वाहतुकीसाठी पाठविले. ही माहिती मिळताच स्थानिक ट्रक चालकांनी मुंबई - गोवा महामार्गावर जाऊन ट्रक रोखले व त्यांना परत जाण्याची विनंती केली. त्यानुसार सांगलीहून आलेले ट्रक परत गेले आहेत. जिल्हा प्रशासनाने वेळेत हस्तक्षेप करून स्थानिकांना न्याय द्यावा, अशी मागणी स्थानिक ट्रकचालकांनी केली आहे....प्रयत्न हाणून पाडूस्थानिकांना डावलून क्रीएटिव्ह ग्रेन कंपनीने परजिल्ह्यातील ट्रक आणून येथे धान्य वाहतूक करण्याचा प्रयत्न केला तर तो प्रयत्न हाणून पाडू, असा इशारा रत्नसिंधु चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष संकेत चवंडे यांनी दिला आहे.