रत्नागिरी : रत्नागिरी दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रत्नागिरीचे ग्रामदैवत असलेल्या कालभैरव तथा भैरीबुवाच्या मंदिरात भेट दिली. मात्र त्याआधी रत्नागिरी पोलीस दलातील श्वानपथकाने मंदिराची तपासणी केली त्यावेळी श्वानांनी भैरीबुवाला सलामी दिली. त्याचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होत आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज, रत्नागिरीतील विविध विकास कामांच्या उद्घाटनासाठी दाखल झाले आहेत. मारुती मंदिर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घातला. त्यानंतर प्रथम त्यांनी भैरीबुवाचे दर्शन घेतले आणि मग ते बैठकीसाठी रवाना झाले.या भेटी आधी रत्नागिरी पोलिसांच्या श्वानपथकाने मंदिराची तपासणी केली. श्वान पथकाच्या प्रमुख सहाय्यक पोलिस निरीक्षक प्राप्ती मंचेकर, हवालदार प्रीतेश शिंदे, शिपाई आशिष रहाटे, सुमित पडेलकर, चालक सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मंगेश कदम, हवालदार संभाजी घुगरे यात सहभागी झाले होते. या तपासणी दरम्यान रॉक आणि राणा या दोन श्वानांनी भैरीबुवासमोर सलामी दिली. रॉकचे हस्तक स्वप्नील गोवळकर आणि राणाचे हस्तक मयुर कदम यांच्या सूचना घेत श्वानांनी सलामी दिली.
रत्नागिरीचे ग्रामदैवत भैरीबुवाला पोलिसांच्या श्वानांनी दिली सलामी
By मनोज मुळ्ये | Published: December 16, 2022 5:30 PM