रत्नागिरी : कोकणामध्ये येवू घातलेल्या विविध कंपन्या, शिवाय होणारे बदल, कंपन्यांना ज्या पध्दतीचे मनुष्यबळ हवे त्या पध्दतीचे अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी स्वतंत्र कोकण विद्यापिठाची आवश्यकता आहे. रत्नागिरी व सिंधुदूर्ग जिल्ह्यात ८० महाविद्यालये आहेत. नव्याने दहा महाविद्यालयांना मान्यता मिळाली आहे. त्यामुळे रत्नागिरी, सिंधुदूर्ग व रायगड जिल्ह्यातील महाडपासूनची काही महाविद्यालये एकत्र केली तर शंभर महाविद्यालयांना मिळून स्वतंत्र कोकण विद्यापिठाची मागणी करण्यात येत आहे. लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून संस्था चालक विद्यापिठ मागणी करणार आहेत.जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रातील प्रश्नांसंदर्भात सर्व संस्थाचालक, व म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांची एकत्रित बैठक शासकीय विश्रामगृह येथे आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कोकण विद्यापिठाबाबत भेट घेण्याच निश्चित करण्यात आले. यावेळी शैक्षणिक संस्था चालकांच्या विविध प्रश्नांवर चर्चा व विचारविनिमय करण्यात आले.चेन्नई येथील मेरिटाईम विद्यापिठातंर्गत कोकणातील बंदरे, बंदराशी निगडित अभ्यासक्रमांसाठी उपकेंद्र रत्नागिरीत सुरू करावे. या उपकेंद्रासाठी चाफे येथे ५० एकर जागा मंजूर करण्यात आली असून याबाबत पुढील कामकाज सुरू करण्यात यावे. कोकणाला विस्तीर्ण किनारपट्टी लाभली आहे. मासेमारी मोठ्या प्रमाणावर होत असल्याने किनारपट्टीवर स्वतंत्र मत्स्य विद्यापिठ निर्माण करण्याचीही मागणी संस्था चालकांनी केली आहे.पवित्र पोर्टलव्दारे शिक्षक भरतीला विरोध, माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय यांच्या शिक्षकेत्तर कर्मचारी भरतीवरील बंदी तात्काळ उठविणे, शिष्यवृत्तीसाठी असलेले महाडिबीटी पोर्टल ओपन न होणे, छत्रपती शाहूू महाराज शिष्यवृत्ती, ओबीसीना मिळणारी फी सवलत वेळेवर न मिळणे, कार्यरत शिक्षकांवर काही ठिकाणी आरक्षण ठरविले जाणे, रोस्टरनुसार आरक्षण पुरेसे न मिळणे, शाळा, कनिष्ठ महाविद्यालयामध्ये नियमित मुख्याध्यापक भरण्यातील प्रशासकीय अडचणी व शिक्षण खात्याकडून योग्य मार्गदर्शन न मिळणे तसेच केलेल्या नियुत्यांना मंजूरी न मिळणे, कनिष्ठ महाविद्यालयाच्या बायोमेट्रिक्स हजेरीमुळे अध्यापनावर होणारा परिणाम, शिक्षक भरती बंदी काळात संस्थांनी अस्थापनेवर नेमलेल्या शिक्षकांच्या सेवेचा विचार शासन पातळीवर करणे, अतिरिक्त शिक्षकांची नावे व माहिती संस्था पदाधिकाऱ्यांच्या सही शिक्याच्या पत्रानेच स्विकारण्याचा आग्रह धरणे तसेच अतिरिक्त शिक्षकाचे समायोजन व समावेशन परस्पर मुख्याध्यापकांना न कळविता ते संस्थेला कळविण्याबाबत आग्रह धरणे. शिक्षण संस्था मागील वर्षाच्या पायाभूत पदानुसार न ठरविता ती उपलब्ध विद्यार्थी संख्येच्या निकषानुसार व आरटीई अॅक्ट नुसार मंजूर करणे. शिक्षण संस्था चालक राज्य संघटनेच्या आदेशानुसार शाळा बंद ठेवण्याबाबत विचार करणे, इत्यादी विषयावर सखोल चर्चा करण्यात आली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून समस्या मांडण्याचे निश्चित करण्यात आले. संबंधित मागण्यासाठी संस्था चालक पाठपुरावा तर करणार आहेत, शिवाय वेळ पडल्यास आंदोलन, न्यायालयीन लढ्याची तयारी संस्था चालकांनी दर्शविली आहे.सभेला संस्था चालक संघाचे अध्यक्ष अॅड.विलास पाटणे, कार्यवाह श्रीराम भावे, जावेद ठाकूर (राजापूर), नाना मयेकर (मालगुंड), आंबा सावंत, विनोद दळवी (मंडणगड) यांच्या सह ७२ संस्थाचालक सभेला उपस्थित होते. म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी संस्था चालकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी सर्वोतोपरी पाठिंबा दर्शविला आहे.