रत्नागिरी : श्रावणामध्ये मांडवीतील श्री भैरी मंदिर व राजीवडा येथील श्री काशिविश्वेश्वर मंदिरात नामसप्ताहचे आयोजन करण्यात आले होते. सात दिवसांच्या सप्ताहची सोमवारी सकाळी सांगता झाली. त्यानंतर दोन्ही मंदिरातून देवतांच्या पालख्या बाहेर पडल्या. या दोन्ही पालख्यांची भेट विश्वेश्वर घाटीत झाली. पालखी भेटीचा अनोखा संगम पाहण्यासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती.श्रावणात व्रतवैकल्ये करण्यात येतात. त्यानुसार ठिकठिकाणच्या ग्राममंदिरांमध्ये नामसप्ताह व एक्क्याचे आयोजन केले जाते. नामसप्ताहामध्ये सलग आठवडाभर मंदिरात भजनाच्या बारी सादर करण्यात येतात. त्यानुसार मांडवीतील श्री भैरी व श्री विश्वेश्वराच्या देवळात नामसप्ताह सुरू होता.
सोमवारी दोन्ही मंदिरातील नामसप्ताहची सांगता झाली. त्यानंतर दोन्ही मंदिरातून पालख्या ग्रामप्रदक्षिणेसाठी बाहेर पडल्या. मात्र, दरवर्षी विश्वेश्वराच्या घाटीतच पालख्यांची भेट होत असते. त्यामुळे भाविक सकाळपासून हा आनंद लुटण्यासाठी व दर्शनासाठी उपस्थित होते.