शोभना कांबळेरत्नागिरी : सहकाराच्या मंत्राने आज ग्रामीण भागातील महिला बचतगट प्रगती करू लागले आहेत. कृषी विभागाच्या सहकार्याने नवनवीन प्रयोग करून अर्थार्जनाची साधने आणि उत्पन्न ते मिळवू लागले आहेत.
गुहागर तालुक्यातील असगोली येथील श्री व्याघ्रांबरी स्वयंसहायता बचत गटाने गांडूळखत प्रकल्पाबरोबरच सामुहिक शेतीचा प्रयोग करून इतर बचत गटांसमोर वेगळा आदर्श निर्माण केला आहे. या बचत गटाच्या कार्याची दखल घेऊन रत्नागिरीतील श्रीमती यमुनाबाई खेर ट्रस्टचा पुरस्कार या गटाला प्रदान करण्यात आला आहे.या बचत गटाच्या अध्यक्षा सुजाता कावणकर यांच्या पुढाकाराने गावातील अनिता कावणकर, सुलभा रामाणे, सविता कोळंबे, विजया कोळंबे, तारामती पानगले, राधिका घाणेकर, रंजना कावणकर, वंदना कावणकर या दहा महिलांनी एकत्र येत १ जानेवारी २००४ रोजी श्री व्याघ्रांबरी स्वयंसहायता बचत गटाची निर्मिती केली.
छोट्याशा मासिक बचतीतून या बचत गटाची वाटचाल सुरू झाली. प्रारंभी गटातील महिलांना घरगुती अडचणींसाठी कर्ज देण्यास प्रारंभ झाला. हे कर्ज घेतानाच त्याची नियमित परतफेड करण्याची सवय या महिलांनी लावून घेतली.या महिलांना गजेंद्र पौनीकर यांचे मार्गदर्शन सातत्याने होत होतेच. त्यामुळे या व्यवसायासाठी या महिलांनी पुढाकार घेतला. त्यासाठी बँकेने आर्थिक मदतीचा हात पुढे करत या गटाला २ लाख रूपये कर्जापोटी देऊ केले. त्याचे या महिलांनीही सार्थक केले.
पहिल्या तीन वर्षात या बचत गटाने ६५ टन गांडूळखताची निर्मिती केली. त्याला बाजारपेठही मिळवली आणि पाच हजार रूपये प्रतिटन या दराने खताची विक्रीही केली.तीन वर्षातच त्यांच्यावरील कर्जाचा बोजाही उतरला. आता तर हा बचतगट १०० टनपेक्षा अधिक गांडूळखताचे उत्पादन करीत आहे.या महिलांनी स्वत:चा उद्योग उभा करतानाच इतर महिलांनाही स्वयंरोजगार मिळवून दिला आहे. या खतनिर्मिती प्रकल्पात गटाबाहेरील महिलांना सहभागी करून घेत त्यांनाही त्यांच्या कामाचा मोबदला दिला जात आहे. गेल्या बारा वर्षात या बचत गटातील महिलांनी ६ लाख ३२ हजार रुपये एवढा निव्वळ नफा मिळवला आहे.२०१६ - १७ या वर्षात या गटाने ३६ टन गांडूळखताची निर्मिती केली आणि ८००० रूपये प्रतिटन दराने त्याची विक्री करून २ लाख ८८ हजार रूपयांचे उत्पन्न मिळवले. यातून गटातील आणि गटाबाहेरील महिलांची मजुरी, वाहतूक खर्च वगळता निव्वळ ९६ हजार रूपयांचा नफा मिळवला. यामुळे बॅँकही सहकार्यासाठी पुढे येत आहे.
या बचत गटाला शासनाचा राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्कार प्राप्त झाला आहे. या महिलांनी चारसुत्री भातलागवडही यशस्वी केली आहे. भाडेतत्वावर शेतजमीन घेऊन त्यावर या महिला ही लागवड करीत आहेत.सक्रिय सहभागकाही महिलांकडे शौचालय नव्हते, अशांना गटांतर्गत कर्जपुरवठा करून शौचालय बांधून दिले. या महिलांनी शेतीशाळेचेही आयोजन केले होते. त्याचप्रमाणे तीन-चार ठिकाणी कच्चे बंधारे बांधून पाणी अडवण्यास मदत केली. दापोली विद्यापीठाचे कृषी प्रदर्शन, पुणे - मुंबई- गणपतीपुळे येथील सरस प्रदर्शनात महिला सहभागी होतात.