खेड (रत्नागिरी) : रसायनाचा टँकर धुतलेले पाणी धरणात आल्यामुळे आज बुधवारी खेड शहराचा पाणी पुरवठा ठप्प झाला आहे. खेडनजीकच्या कशेडी घाटात सरस्वती मंदिरजवळ असलेल्या धबधब्याच्या पाण्यात रसायन वाहतूक करणारा टँकर काल मंगळवारी धुण्यात आला. हे रसायन मिश्रित पाणी एका पऱ्यातून वाहत बोरघर नदीत आले.
दुपारच्या सुमारास स्थानिकांना नदीतील पाण्यात मासे मरत असल्याचे दिसून आले. याची माहिती मनसे कार्यकर्त्यांनी नगराध्यक्ष वैभव खेडेकर याना दिली. बोरघर नदी पुढे भरणे येथे जगबुडी नदीला मिळते.
याठिकाणी नगरपरिषदेची जॅकवेल असून येथून खेड शहराला पाणी पुरवठा केला जातो. या जॅकवेलच्या ठिकाणच्या पाण्याचे नमुने घेऊन तपासणीसाठी रत्नागिरी येथे पाठविण्यात आले असल्याची माहिती नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली.दूषित पाण्याच्या शक्यतेने आज खेड शहराला नगरपरिषदेच्या वतीने पाणी पुरवण्यात आले नाही. पाण्याच्या नमुन्यांची तपासणी अहवाल आल्यानंतर पाणी पुरवठा करण्याबाबत पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.