दापोली : किरकोळ कारणावरून दिवाळीच्या पूर्वसंध्येला विवाहितेवर नवऱ्याने जबर खुनी हल्ला केला. या हल्ल्यात विवाहितेच्या डोक्याला ४० टाके पडले असून सध्या ती मुंबई येथे जे. जे. रुग्णालयात उपचार घेत आहेत. यामध्ये गंभीर जखमी झालेली विवाहिता ही दापोली येथील आहे.दापोली येथील भारतीय स्टेट बँकेतील कर्मचारी रवींद्र खोपकर यांची मुलगी अवनी अल्पेश भोसले (२७) हिचा विवाह अल्पेश भोसले (तळोजा एमआयडीसी, नवी मुंबई) या युवकाबरोबर झाला होता. मात्र काही दिवसावर तिच्या लहान मुलीचा वाढदिवस होता. हा वाढदिवस आपल्या आई वडिलांच्या गावी करण्याचा अल्पेश याचा विचार होता. मात्र पत्नी अवनी हिने या गोष्टीला विरोध केला होता.
बाळंतपणाच्या वेळी तुमचे आई बाबा मला व मुलीला पहायलासुध्दा फिरकले नाहीत. त्यामुळे आपल्या मुलीचा वाढदिवस आपण आपल्या घरीच साजरा करू, असे तिचे म्हणणे होते. मात्र ही बाब नवऱ्याला रुचली नाही. त्याचा राग मनात धरून दि. ४ नोव्हेबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता या विषयावरून पुन्हा वाद झाला व रागाच्या भरात नवरा अल्पेश याने अवनीवर खुनी हल्ला केला. चाकूच्या सहाय्याने त्याने पत्नीवर सपासप वार केले.एवढ्यावरच न थांबता क्रिकेटच्या बॅटने दोन्ही हातापायावर फटके मारले. पत्नीला बेदम मारहाण करुन बेशुद्ध अवस्थेत तिला एका खोलीमध्ये कोंडुन ठेवले व तो बाहेर फिरायला गेला. फिरून आल्यावर रक्ताच्या थोराळ्यात विव्हळत पडलेल्या अवनीला पुन्हा बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. पोटावर व मानेवर पाय ठेऊन घरातील सिलेंडरही तिच्या डोक्यात घालून जिवे मारण्याचा प्रयत्न केला.घटना घडत असतानाच इमारतीमधील काही प्लॅटधारक दिवाळीचा कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी अल्पेश भोसले याच्या घरी आले असताना हा प्रकार समोर आला. रक्ताच्या थारोळ्यात विव्हळत पडलेल्या आपल्या पत्नीला गाडीत टाकून तो पनवेल येथील हॉस्पीटलमध्ये घेऊन गेला पण जबर जखमी झालेल्या अवनीला अधिक उपचारासाठी मुंबई येथे जे जे रूग्णालयात हलविण्यात आले.घटनेची खबर पनवेल पोलिसांना मिळताच त्यांनी अवनीचे जाब जबाब नोंदवून घेतले व अल्पेश बापू भोसले याच्यावर भारतीय दंड विधान कलम ३२५, ३२६ व ४९६ (अ ) अन्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.