रत्नागिरी : जिल्ह्यातील स्थानिक उत्पादने इतर देशात निर्यात व्हावीत या दृष्टिकोनातून एक जागतिक दर्जाचे निर्यात केंद्र विकसित करण्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे. या माध्यमातून जिल्ह्याला नवीन ओळख मिळावी या दृष्टिकोनातून प्रयत्न करण्यात येत आहेत. या स्वरूपाचे निर्यात केंद्र रत्नागिरीत निर्माण होईल, असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. बी. एम. पाटील यांनी व्यक्त केला.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील अल्पबचत सभागृहात ‘आजादी का अमृत महोत्सव-७५’ स्वातंत्र्यदिनाच्या वर्धापन दिनानिमित्त केंद्र शासनाच्या वाणिज्य विभागामार्फत Exporters' Conclaves (निर्यातदारांचे संमेलन) व रत्नागिरी जिल्ह्यातील निर्यात होणारी उत्पादने व सेवा यांच्या प्रदर्शनाचे शुक्रवारी आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संतोष कोलते, जिल्हा अग्रणी प्रबंधक एन. डी. पाटील, पणन विभागाचे सरव्यवस्थापक मिलिंद जोशी, उद्योजक अमर देसाई, आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी म्हणाले, आंबा, काजू, कोकम व त्यांची उत्पादने तसेच जिल्ह्याला समुद्रकिनारा लाभल्याने समुद्री उत्पादने यांना जागतिक बाजारात निर्यातीसाठी मोठा वाव आहे. स्थानिक ठिकाणी उपलब्ध ही उत्पादने आणखी विकसित करून त्यांची इतर देशांमध्ये निर्यात आणखी वाढविणे शक्य आहे. त्यामुळे येथे रोजगार निर्मितीही होईल आणि निर्यात वाढल्याने येथील उद्योजकांबरोबर जिल्ह्यालाही त्याचा फायदा होईल. जिल्ह्यातील बचत गटांमार्फत तयार करण्यात येणाऱ्या विविध उत्पादनांच्या निर्यातीसाठीदेखील मोठ्या प्रमाणावर वाव आहे. या बचत गटांची उत्पादने एकत्र करून, निर्यातदार तयार करून त्यांच्यामार्फतही जिल्ह्यातील निर्यात वाढवून जिल्ह्याला त्याचा फायदा होऊ शकेल, असेही ते म्हणाले. स्थानिक नवउद्योजकांना उत्पादने निर्यातीसाठी आवश्यक माहिती उपलब्ध करून देऊन त्यांच्यातूनही नवीन निर्यातदार तयार होतील, असाही विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
महाव्यवस्थापक संतोष कोलते यांनी Ratnagiri District Export Action Plan चे सादरीकरण यावेळी केले. आंबा निर्यातीसंदर्भात मार्गदर्शन करताना पणन विभागाचे मिलिंद जोशी यांनी निर्यात करणे किती महत्त्वाचे आहे, ते का महत्त्वाचे आहे, त्याचे होणारे फायदे, कोणती काळजी घेणे गरजेचे आहे, आदींबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.