रत्नागिरी : जलतरण तलाव व जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील प्रशासकीय इमारत वगळता अन्य सर्व कामांना मंजुरी प्राप्त झाली असून, काही कामांसाठी निधी प्राप्त होऊन कामांना प्रारंभही झाला आहे. येत्या दोन ते तीन वर्षात पर्यटन असो वा अन्य विकासात्मक कामांमुळे रत्नागिरी शहराची महाराष्ट्रातील सुंदर शहर म्हणून ओळख प्राप्त होईल व लाखो पर्यटक जिल्ह्यात येतील, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले.
रत्नागिरीचा शाश्वत विकास या कार्यक्रमांतर्गत रत्नागिरी शहर व तालुक्यातील शैक्षणिक, क्रीडा, पर्यटन, शहर विकासाबाबत कामे सुरू झाली आहेत. या कामांची माहिती नागरिकांना व्हावी, यासाठी स्वा. सावरकर नाट्यगृह येथे रविवारी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, जिल्हाधिकारी डाॅ. बी. एन. पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी इंदुराणी जाखड, कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. श्रीरंग कद्रेकर, उद्योजक प्रसन्न आंबुलकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी चित्रफितीच्या माध्यमातून प्रस्तावित कामे व सुरू झालेल्या कामांचे सादरीकरण करण्यात आले. त्यानंतर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मार्गदर्शन केले.
कोरोना काळात जिल्ह्यातील विकास कामांसाठी ८५० कोटी रुपये आणणे शक्य झाले असून, त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांचे सहकार्य लाभल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. या व्यतिरिक्तही जिल्ह्यातील अन्य तालुक्यात काही प्रकल्प मंजूर आहेत. लवकरच अशाच प्रकारे कार्यक्रमाचे आयोजन करून रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यासह कोकणात सुरू असणाऱ्या व नियोजित कार्यक्रमाची माहिती देण्यात येणार असल्याचे सांगितले.