रत्नागिरी : पावसाळ्यानंतर सर्वप्रथम पारंपरिक मासेमारीला १ आॅगस्टपासून सुरूवात झाली. १ सप्टेंबरपासून पर्ससीन नौकांकडून सागरी मासेमारीला सुरूवात होणार आहे. मात्र, पर्ससीन नौकांची घुसखोरी रोखावी व बेकायदा मासेमारी करणाऱ्या जिल्ह्यातील शेकडो नौकांवर बंदरांमध्येच कडक कारवाई करावी, अशी मागणी पारंपरिक मच्छीमारांच्या संघटनांनी २४ आॅगस्ट रोजी एका निवेदनाद्वारे राज्याच्या मत्स्य आयुक्तांकडे केली आहे. त्यामुळे पारंपरिक व पर्ससीन मच्छीमारांमधील वाद यंदाही चिघळण्याची शक्यता आहे.१ आॅगस्टपासून पारंपरिक मासेमारी सुरू झाली. मात्र, पावसाचा व तुफानी वाऱ्याचा दणका बसल्याने मासेमारी ठप्प झाली आहे. त्यामुळे पारंपरिक मच्छीमारांचे नुकसान झाले आहे. १ सप्टेंबरपासून पर्ससीन मासेमारीला सुरूवात होणार असून, ३१ डिसेंबरपर्यंत ही मासेमारी शासकीय आदेशानुसार सुरू राहणार आहे.दि. ५ फेब्रुवारी २०१६च्या शासन आदेशानुसार १ सप्टेंबर ते ३१ जानेवारी या चार महिन्यांमध्येच पर्ससीन मासेमारीला परवानगी आहे. त्यामुळे पर्ससीन नौकांकडून पारंपरिकच्या सागरी क्षेत्रात होणारी घुसखोरी व परवाना नसलेल्या शेकडो नौकांकडून होणारी बेकायदा मासेमारी रोखण्यासाठी कडक कारवाईचे आदेश राज्याच्या मत्स्य आयुक्तांनी संबंधित जिल्ह्यातील यंत्रणेला दिले आहेत.
त्यानुसार विनापरवाना मासेमारी करणाऱ्या पर्ससीन नौकांना बंदरातच कारवाई करून रोखून धरले जाणार आहे. त्याचबरोबर २५ मिलिमीटरपेक्षा कमी आस असलेली पर्ससीन जाळी वापरणाऱ्या नौकांचे परवाने रद्द केले जाणार आहेत.जिल्ह्यात परवानाधारक पर्ससीन नौका २७२, तर परवानाधारक पारंपरिक मच्छीमारी नौका ३५० आहेत. परंतु या अधिकृत नौकांव्यतिरिक्त बेकायदा मासेमारी करणाऱ्या ५००पेक्षा अधिक नौका जिल्ह्याच्या सागरी हद्दीत गेल्या अनेक वर्षांपासून बेकायदा मासेमारी करीत आहेत. त्यातील ३५० नौका या मोठ्या आहेत.
त्यामुळे बेकायदा नौकांवर कारवाईची मागणी पारंपरिक मच्छीमारांच्या संघटनांनी शासनाकडे केली आहे. अशा नौकांना शासन आदेशानुसार यावेळी मत्स्य अधिकाऱ्यांनी बंदरांमध्येच रोखून कारवाई करण्याची मानसिकता दाखवावी. त्यांना अभय मिळाल्यास पारंपरिक मच्छीमार तीव्र आंदोलन करतील, असा इशारा महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष खलील वस्ता यांनी दिला आहे.जिल्ह्यात परवानाधारक पर्ससीन नौका २७२रत्नागिरी जिल्ह्यात पर्ससीन मासेमारी करणाऱ्या परवानाधारक २७२ बोटी आहेत. त्यामध्ये २६० मोठ्या नौका, तर १२ मिनी पर्ससीन नौकांचा समावेश आहे. पारंपरिक अर्थात शाश्वत मासेमारी करणाऱ्या नौकांची जिल्ह्यातील संख्या ३५० असून, त्यातील २५० नौका या विनाइंजिनच्या आहेत. या सर्व अधिकृत नौकांना शासनाने ठरवून दिलेल्या सागरी हद्दीमध्येच मासेमारी करता येणार आहे.शासनाचे नियम, निर्बंध
- राष्ट्रीय सहकार विकास निगम (एनसीडीसी) योजनेतून उभारलेल्या नौकांना पर्ससीन जाळ्याने मासेमारी करण्यास बंदी आहे.
- राज्यातील ४९४ पर्ससीन परवानाधारक नौकांना झाई ते मुरूड सागरी भागात पर्ससीन मासेमारीस १२ महिने बंदी राहणार आहे.
- सर्व परवानाधारक पर्ससीन नौकांनी मुरूड ते बुरोंडी १० मीटर, बुरोंडी ते जयगड २० मीटर, जयगड ते बांदा २५ मीटर खोल असलेल्या पाण्यातच मासेमारी करावयाची आहे.
- परवानाधारक पर्ससीन मच्छीमारी नौकांनी २५ मिलिमीटरपेक्षा कमी आस असलेल्या पर्ससीन जाळ्यांनी मासेमारी करू नये.
- हैड्रॉलिक विंच (बूम)च्या सहाय्याने भूल देऊन, रसायनांचा वापर करून तसेच एलईडी लाईटचा वापर करून मासे पकडण्यास बंदी आहे.