विहार तेंडुलकररत्नागिरी : कोकण रेल्वेचे पावसाळी वेळापत्रक १० जूनपासून लागू होत असले तरी यादरम्यान कोकण आणि मुंबईत अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिल्याने पावसाळी वेळापत्रक लागू होण्याअगोदरच रेल्वेचा वेग मंदावण्याची चिन्हे आहेत.कोकणात गेल्या दोन दिवसात पडलेल्या पावसाच्या तुलनेत पुढील तीन दिवस जादा पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवल्याने कोकण रेल्वेचा वेग काही ठिकाणी ४० किमी प्रतितास एवढा होऊ शकतो. हा वेग आताच्या वेगापेक्षा निम्म्याहूनही कमी आहे. त्यामुळे कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडू शकते.
कोकण रेल्वेचे पावसाळी वेळापत्रक १० जून ते ३१ आॅक्टोबर या काळात अंमलात राहणार आहे. यादरम्यान कोकण रेल्वेचा वेग हा १००वरून ७५-९० किमी प्रतितास असा राहणार आहे. कोकणातील पावसाचे आगमन लक्षात घेऊन कोकण रेल्वेने पावसाळी वेळापत्रकासाठी हा काळ निवडला आहे. मात्र, अवकाळी पावसाने १ जूनपासूनच जोरदार बॅटिंग सुरु केली आहे.
आता लवकरच मान्सूनही सक्रिय होणार असून, त्यामुळे पावसाची बरसात पुढील काही दिवस अशीच राहणार आहे. मात्र, हवामान खात्याने तीन दिवसांसाठी मुंबई, कोकणात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. मुंबईत तर गरज असेल तरच नागरिकांनी बाहेर पडावे, असा इशारा देण्यात आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातही वादळी वाऱ्यासह अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.हा इशारा ध्यानी घेता कोकण रेल्वेला १० जूनपूर्वीच आपला वेग कमी करावा लागणार, असे सध्याचे चित्र आहे. कोकण रेल्वेचा सध्याचा वेग हा जास्तीत जास्त ११० ते १२० किमी प्रतितास एवढा असतो. पावसाळी वेळापत्रक लागू झाल्यानंतर म्हणजेच, १० जूनपासून हा वेग तासी ७५ ते ९० किमी एवढा राहणार आहे.
अतिवृष्टी झाल्यास हा वेग त्या त्यावेळी ४० किलोमीटर प्रतितास एवढा असणार आहे. तशा सूचना रेल्वे प्रशासनातर्फे संबंधितांना देण्यात आल्या आहेत. पुढील तीन दिवस अतिवृष्टीच्या इशाऱ्यानुसार, हा वेग १० तारखेपूर्वीच कमी करावा लागणार, अशी चिन्ह आहेत.
हवामान खात्याने पुढील तीन दिवसात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. या काळात मुसळधार पाऊस झाल्यास कोकण रेल्वेचा वेग हा पावसाळी वेळापत्रकापूर्वी म्हणजेच १० जूनपूर्वी कमी होऊ शकतो. अगदी अतिवृष्टी झाल्यास वेग ४० किलोमीटर प्रतितास एवढा कमी आणण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्या-त्यावेळी मान्सूनच्या स्थितीनुसार कोकण रेल्वेच्या वेगाबाबतचा निर्णय घेतला जाईल.- एल. के. वर्मा,मुख्य जनसंपर्क अधिकारी, कोकण रेल्वे
प्रशासनाकडून इशारादिमुसळधार पावसाची शक्यता आहे. वादळीवारा आणि विजांच्या गडगडाटासह हा पाऊस बरसणार असून, जनतेने सावधानता बाळगावी, अतिवृष्टीच्या वेळी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी, रत्नागिरी यांनी केले आहे.रेल्वेगाड्या १५-६० मिनिटे उशिरागतवर्षीच्या तुलनेत यंदा कोकण रेल्वेच्या वेळापत्रकावर फारसा परिणाम झालेला नाही. गुरुवारी कोकण रेल्वे मार्गावरील गाड्या या १५ ते २० मिनिटे, तर लांब पल्ल्याच्या गाड्या ५० ते ६० मिनिटे उशिराने धावत होत्या. गेल्यावर्षी दीड ते दोन तास रेल्वे उशिराने धावत होत्या