राजापूर : काट्यासारखं मार्गात येणाऱ्या संकटांना न डगमगता त्यावर यशस्वी मात करण्याची जिद्द विद्यार्थ्यांनी बाळगताना आपल्या भविष्याचे सोने करावे, असे आवाहन ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांनी पाचल येथे बोलताना केले. सरस्वती विद्यामंदिर, पाचलच्या वार्षिक स्नेहसंमेलनप्रसंगी आयोजित कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून त्या बोलत होत्या.यावेळी पाचलच्या सरपंच अपेक्षा मासये, उपसरपंच किशोर नारकर, राष्ट्रवादी युवकचे राज्य उपाध्यक्ष अजित यशवंतराव, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मोहन नारकर, माजी सरपंच अशोक सक्रे, बाबा सावंत, अण्णा पाथरे, अशोक गंगाराम सक्रे, पाचल संस्थेचे आजी - माजी पदाधिकारी, विद्यालयाचे मुख्याध्यापक, सर्व वर्गशिक्षक, कर्मचारी, अनेक मान्यवर, सर्व विद्यार्थी व त्यांचे पालक उपस्थित होते.आपल्या संघर्षमय जीवनात आलेल्या संकटांचा यशस्वी मुकाबला करताना एवढ्या पदापर्यंत कशी मजल मारता आली? त्याचा लेखाजोखाच त्यांनी मांडला. त्यामध्ये पतीने घराबाहेर कसे काढले, त्यानंतर सासरसह माहेरच्या मंडळींनी न दिलेला आसरा, उदरनिवार्हासाठी प्रसंगी रेल्वेत लहान मुलीसह मागावी लागलेली भीक, त्यावेळी आलेले मानहानिकारक प्रसंग, स्मशानात राहून जळत्या चितेवर भाजून खाव्या लागलेल्या भाकऱ्या इथपासून जीवन संपविण्याचे मनात आलेले विचार, त्यावेळी आलेले अनेक बरे-वाईट अनुभव असा आपला जीवनपटच त्यांनी उलगडला.या सर्व प्रसंगांना आपण धीराने सामोरे गेलो आणि ठरविले की, आता मागे हटायचे नाही. आजवर जीवनाला कंटाळून ते संपवायचे असा विचार कायम मनात असायचा. पण, त्या विचारांपासून परावृत्त करणाऱ्या थरारक घटनादेखील घडल्या आणि त्यातून योग्य तो बोध घेऊन जीवनाचे खरे महत्व कळाले. यापुढे कितीही संकटे येऊदे पण स्वत: मरायचे नाही तर मरणाऱ्यांसाठी जगायचे, असा निर्धार त्यांनी केला.विद्यार्थ्यांनीदेखील येणाऱ्या प्रत्येक संकटाला धैर्याने सामोरे गेले पाहिजे. त्यापासून अजिबात डगमगून जायचे नाही, असा निश्चय करा, असे आवाहन करताना तुमच्या जीवनाचे सोने कसे होईल, याकडे लक्ष द्या, त्यासाठी आपले काळीज धगधगते ठेवले पाहिजे, अशा शब्दात त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना साद घातली. तसेच आई - वडिलांना विसरु नका, याची जाणीव करुन दिली.
रत्नागिरी : न डगमगता संकटावर जिद्दीने यशस्वी मात करा : सिंधुताई सपकाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 5:37 PM
संकटांना न डगमगता त्यावर यशस्वी मात करण्याची जिद्द विद्यार्थ्यांनी बाळगताना भविष्याचे सोने करावे, असे आवाहन ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांनी पाचल येथे सरस्वती विद्यामंदिर, पाचलच्या वार्षिक स्नेहसंमेलनप्रसंगी आयोजित कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून बोलताना केले.
ठळक मुद्देमानहानिकारक जगणे आणि संकटांमधून बोध घेऊनच मिळाली जगण्याची ताकद : सिंधुताई पाचलच्या सरस्वती विद्यामंदिर वार्षिक स्नेहसंमेलनप्रसंगी आयोजित कार्यक्रमात प्रमुख अतिथी