रत्नागिरी : जिल्हा नियोजन समितीच्या नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा म्हणून बांधण्यात येणाऱ्या नाना-नानी पार्कचे काम पूर्णत: थांबले असून, या कामाची पार दुरवस्था झाली आहे. या कामाकडे दुर्लक्ष झाल्याने सध्या या ठिकाणी उद्यान होणार आहे की गवताचे कुरण, असा सवाल केला जात आहे.ज्येष्ठ नागरिकांसाठी नाना - नानी पार्क व ज्येष्ठ नागरिक संघाला सभागृह यासाठी नाविन्यपूर्ण योजनेखाली २०१३ - १४मध्ये ४८ लाख रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. हा निधी जिल्हा नियोजन समितीकडून नगर परिषदेकडे वर्ग करण्यात आला आहे.
नागरिक संघाच्या सभागृहाचा लोकार्पण सोहळा ११ फेब्रुवारी २०१६ रोजी खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते तसेच माजी राज्यमंत्री, आमदार उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. त्यानंतर हे सभागृह ज्येष्ठ नागरिक संघाकडे हस्तांतरीत करण्यात आले.
सभागृहाचे हस्तांतरण झाल्यास पावणेदोन वर्षाचा कालावधी उलटला आहे. मात्र, या सभागृहाच्या शेजारी प्रस्तावित असलेल्या नाना - नानी पार्कचे काम त्यानंतर आत्तापर्यंत थांबवण्यात आलेले आहे. सध्या ज्येष्ठ नागरिक संघाचे कार्यालय या जागेत सुरळीत सुरू आहे. मात्र, नाना - नानी पार्कच्या कामाचा विसर नगर परिषदेला पडलेला दिसत आहे.या नाना - नानी पार्कची दुरवस्था झाली असून, या भागात गवताचे साम्राज्य माजले आहे. या दोन्ही कामांसाठी नगर परिषदेकडे आधीच निधी देण्यात आलेला असतानाही दोन वर्ष होत आली तरीही हे काम का थांबविण्यात आले, असा सवाल करण्यात येत आहे.
याप्रकरणी ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी सुभाष थरवळ यांनी जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांच्याकडे तक्रार केली आहे. या तक्रारीसोबत या कामाची सद्यस्थिती दर्शवणारा अहवाल छायाचित्रासह सादर केला आहे. त्यामुळे नाना-नानी पार्कचे काम मार्गी लागेल, असा विश्वास ज्येष्ठ नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे.काम मार्गी लागणार?नाना-नानी पार्कसाठी ४८ लाख रूपयांचा निधी नगर परिषदेकडे आधीच वर्ग करण्यात आला आहे. मात्र, तरीही या कामाची दुरवस्था झाली आहे. हे काम पूर्णत: थांबलेले आहे. त्यामुळे प्रत्यक्षात हे काम का थांबलेले आहे, याची चौकशी करावी, त्याचा अहवाल हा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करावा.
हे काम विनाविलंब पूर्ण करून लाभार्थ्यांना त्याचा लाभ मिळवून द्यावा, असे पत्र जिल्हा प्रशासन अधिकारी शिल्पा नाईक यांनी रत्नागिरी नगर परिषदेला पाठविले आहे. त्यामुळे आता हे काम मार्गी लागण्याची आशा ज्येष्ठ नागरिकांना आहे.