रत्नागिरी : इ ग्रामस्वराज-पीएफएमएस प्रणालीमध्ये पंधराव्या वित्त आयोगाचा निधी वितरित करण्यामध्ये रत्नागिरी जिल्हा परिषदेने राज्यात दुसरा येण्याचा मान पटकावला.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण मरभळ यांच्या विशेष प्रयत्नातून, तसेच प्रभारी मुख्य लेखा व वित्त अधिकारी शरद शिंदे यांच्या सहकार्याने ही प्रक्रिया जलदगतीने पार पडली. ही प्रणाली यशस्वीपणे पार पाडण्यासाठी वेळोवेळी सहकार्य करणारे विस्तार अधिकारी बाळाजी पोशेट्टी, मास्टर ट्रेनर स्वामी, वसीम खान, जिल्हा व्यवस्थापक अतुल गभाने, भूषण आग्रे आणि संगणक परिचालक प्रतीक्षा विचारे यांनी मोलाची भूमिका पार पाडली.
केंद्रीय पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीचे सोयीस्कर वितरण व्हावे, म्हणून केंद्र शासनाने सन २०२१-२२ पासून पीएफएमएस प्रणालीमार्फत निधी वाटप करण्याचे आदेश सर्व जिल्हा परिषदा, पंचायत समिती व ग्रामपंचायतींना दिले होते. तथापि हे सर्व होण्याकरिता सन २०२०-२१ चे वार्षिक आराखडे व कॅशबुक ऑनलाईन पूर्ण असणे गरजेचे होते.
रत्नागिरी जिल्हा परिषदेचे सन २०२०-२१ चे रुपये ३ कोटी २७ लाख २६ हजार रकमेचे एकूण ४ आराखडे व कॅशबुक योग्यरित्या ऑनलाईन पूर्ण करण्यात आले आहे. आराखड्यातील पूर्ण झालेल्या कामांच्या परिपूर्ण देयकांची रक्कम संबंधित मक्तेदारांचे खाती पीएफएमएस प्रणालीद्वारे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्याहस्ते प्रथम देयकाची रक्कम वर्ग करण्यात आली असून, यामध्ये रत्नागिरी जिल्हा परिषद राज्यात दुसरी आली आहे.