अरुण आडिवरेकर रत्नागिरी : मधुमेह, कॅन्सर, उच्च रक्तदाब, लकवा यांसारख्या दुर्धर आजारांचे निदान करणे आणि त्यावर उपचार करणे आता ग्रामीण भागातही शक्य होणार आहे. जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये या आजारांचे निदान करण्याची व्यवस्था सुरू होणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेला आता गावातच या आजारांवर उपचार करणे शक्य होणार आहे.बदलती जीवनशैली आणि वाढते प्रदूषण यामुळे विविध आजारांना निमंत्रण मिळत आहे. खाण्यावर योग्य नियंत्रण नसणे आणि खाण्याचे योग्य नियोजन नसणे, यामुळे अनेक आजार उद्भवू लागले आहेत. मधुमेह, कॅन्सर, उच्च रक्तदाब (हायपर टेन्शन), लकवा (स्ट्रोक) यांसारख्या आजारांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे.
या आजारांमुळे अनेकवेळा रूग्णाचा मृत्यूही ओढवतो. त्यामुळे या आजारांचे लवकर निदान होणे गरजेचे आहे. वेळीच त्यांचे निदान झाल्यास त्यावर उपचार करून आजार नियंत्रणात आणता येऊ शकतात.या आजाराची लक्षणे दिसल्यानंतर त्याचे निदान करणे आणि त्यावर उपचार करणे, हे सर्वसामान्य माणसाच्या खिशाला परवडणारे नसते. त्यामुळे अनेकवेळा निदान होऊनही कमी प्रमाणात उपचार केले जातात. मात्र, आता सर्वसामान्यांना त्यांच्या खिशाला परवडेल आणि जवळच्या ठिकाणी त्यावर उपचार करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.रत्नागिरीजिल्हा परिषदेअंतर्गत जिल्ह्यातील ६७ प्राथमिक आरोग्य केंद्रावर या आजारांचे निदान करता येणार आहे. तसेच त्या आजारांवरील औषधोपचारही उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. मात्र, आजाराचे प्रमाण अधिक आढळून आल्यास रूग्णाला जिल्हा शासकीय रूग्णालयात पाठविण्यात येणार आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये प्रथमच ही सुविधा उपलब्ध होणार आहे. यामध्ये ३० वर्षांवरील कोणतीही व्यक्ती फायदा घेऊ शकते. या सुविधेसाठी अधिकारी व कर्मचारी यांना योग्य ते प्रशिक्षण देण्यात आले असून, लवकरच या आजारांचे निदान प्राथमिक आरोग्य केंद्रावर करण्यात येणार आहे.- डॉ. अनिरूद्ध आठल्ये, जिल्हा आरोग्य अधिकारी, रत्नागिरी.
उच्च रक्तदाबआहारात जास्त मीठ, अतिरिक्त शरीराचे वजन, धूम्रपान आणि दारू यामुळे उच्च रक्तदाब संभवतो. यामुळे क्रोनिक किडनी रोग, मूत्रपिंड, धमन्यांची संकुचिता होऊ शकते. सर्वसामान्य रक्तदाबाचे प्रमाण १०० ते १३० मिलिमीटर इतके असणे गरजेचे आहे.कर्करोगलठ्ठपणा, खराब आहार, दारूचे अति व्यसन, पर्यावरणी प्रदूषण यामुळे कॅन्सरचा आजार उद्भवतो. दीर्घकाळ खोकला लागणे, अनपेक्षितपणे वजन कमी होत जाणे. ही या आजाराची लक्षणे आहेत. त्याचबरोबर आतड्यांवरील हालचालींमध्ये बदल होतात.मधुमेहमधुमेह हा चयापचयाचा एक आजार आहे. शरीरात साखरेचे प्रमाण वाढल्यास हा आजार उद्भवतो. वारंवार लघवी होणे, तहान लागणे आणि वाढलेली उपासमार ही या आजाराची प्रमुख लक्षणे आहेत. हा आजार दीर्घकालीन राहिल्यास हृदयविकाराचा आजार, लकवा, क्रोनिक कीडनी रोग, पाय अल्सर आणि डोळ्यांना त्रास होऊ शकतो.लकवा (स्ट्रोक)हा आजार मेंदूशी निगडीत आहे. अति रक्तस्त्राव आणि रक्तस्त्राव न होणे यामुळे मेंदूचे काम करणे बंद होते. त्यामुळे माणसाला लकवा येऊ शकतो. तंबाखू सेवन, धूम्रपान, लठ्ठपणा, कोलेस्टेरॉलचे वाढते प्रमाण यामुळे लकवा येण्याची शक्यता असते.