प्रकाश वराडकर -- रत्नागिरी -पिण्याच्या पाण्यासाठी गेल्या दहा वर्षांपासून टाहो फोडणाऱ्या रत्नागिरीवासीयांच्या नशिबी यावर्षीही निराशाच आली आहे. मुख्य जलवाहिनीसह अंतर्गत जलवाहिन्यांचे जाळे जुनाट व खराब झाले आहे. त्यामुळे शीळ धरण भरून वाहात असतानाही शहरात काही ठिकाणचे नळ कोरडे आहेत, तर अनेक ठिकाणी कमी दाबाने पाणी येत असल्याने धरण उशाला, कोरड घशाला अशी रत्नागिरीवासीयांची स्थिती झाली आहे. रत्नागिरी शहराला शीळ धरण, पानवल धरणातून मुख्यत्वे पाणीपुरवठा केला जातो. शीळ धरणातून वर्षभर शहराला पाणी पुरविले जाते. पानवल धरणाचे पाणी फेब्रुवारी, मार्च महिन्यात संपुष्टात येते. एमआयडीसीकडून काही प्रमाणात शहराला पाणीपुरवठा केला जातो. शहरात सध्या ९५००पेक्षा अधिक नळ जोडण्या आहेत. मात्र, गेल्या दहा वर्षांपासून शहरातील पाणीपुरवठा व्यवस्थेत बिघाड झाला आहे. शीळ धरणावरून रत्नागिरीतील साळवी स्टॉप जलशुध्दिकरण केंद्राकडे येणारी मुख्य जलवाहिनी गंजल्याने बाद झाली आहे. जागोजागी या जलवाहिनीला गळती असल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाया जाते. तसेच गळतीमुळे पाण्याचा दाबही कमी होतो. शहरातील पाणी कमी दाबाने येण्यामागे थेटपणे देण्यात आलेल्या जोडण्या हे मुख्य कारण आहे. जलशुध्दिकरण केंद्रातून साठवण टाक्यांमध्ये पाणी सोडले जाते. मात्र, त्याच जलवाहिन्यांवर थेटपणे जोडण्या देण्यात आल्या आहेत. त्यामुळे पाण्याच्या टाक्या पूर्णपणे भरत नाहीत व पाणी कमी दाबाने येते. पाणीपुरवठा योग्यरितीने व्हावा, यासाठी गेल्या दहा वर्षांपासून शहरवासीय टाहो फोडत आहेत. मात्र, पालिकेत सत्तेवर आलेल्या कारभाऱ्यांना नागरिकांच्या घशाला पडलेली ही कोरड अद्याप दिसली नाही, अशी टीका होत आहे. नगरपरिषदेच्या निवडणुका आता जवळ आल्या आहेत. येत्या डिसेंबरमध्ये निवडणूक होत असल्याने सर्वच राजकीय पक्षांना आता रत्नागिरीकरांच्या समस्यांचा उमाळा येऊ लागला आहे. पालिकेत भाजपचे नगराध्यक्ष आहेत. त्यामुळे शहरात ६८ कोटी खर्चाची सुधारित पाणीपुरवठा योजना राबवण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. त्यामध्ये शीळ धरणावरील जलवाहिनी बदलणे, पानवल धरणाची सुधारणा करणे, शहरातील वितरण वाहिन्या बदलणे यांसारख्या कामांचा समावेश आहे. या योजनेचा प्रस्ताव जीवन प्राधिकरण कार्यालयाकडून शासनाकडे पाठवण्यात आला होता. मात्र, त्यात ५० त्रुटी आढळल्याने हा प्रस्ताव पुन्हा जीवन प्राधिकरणकडे आला आहे. या त्रुटींची पूर्तता कधी होणार, असा प्रश्न निर्माण झाला असून, निवडणुकीआधी योजनेचा आरंभ होण्याची घोषणा करण्यात आली असली तरी ही योजना ‘हवा हवाई’ झाल्याची चर्चा आहे. चर्चेला ऊत : सुधारित पाणी योजनेचा बार फुसका?रत्नागिरी शहराच्या नळपाणी योजनेचा ६८ कोटींचा हा प्रस्ताव तयार करण्यासाठी व तांत्रिक मंजुरीसाठी जीवन प्राधिकरणने नगरपरिषदेकडून ११ लाख शुल्काची वसुली केली आहे, तरीही ५० त्रुटी कशा काय राहिल्या, असा प्रश्न आता रत्नागिरीकरांतून केला जात आहे. जुनी जलवाहिनी तशीच ठेवून नवीन जलवाहिनी टाकायची, असेही या प्रस्तावात नमूद आहे. असंख्य त्रुटींमुळे परत आलेल्या या प्रस्तावाच्या पूर्ततेला आता अधिक वेळ लागणार असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे निवडणुकीआधी या योजनेचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आरंभ करण्याचा बार फुसका ठरणार काय, अशी चर्चाही आता रत्नागिरीत रंगली आहे.
पावसातही रत्नागिरीकरांच्या घशाला कोरड
By admin | Published: September 26, 2016 10:17 PM