विहार तेंडुलकर
रत्नागिरी : गेल्या पंधरा दिवसापासून वाढलेल्या सोन्याच्या भावामुळे रत्नागिरीच्या सराफी बाजारात सध्या शांतता निर्माण झाली आहे. डिसेंबर २०१८मध्ये ३१ हजारपर्यंत असलेल्या सोन्याच्या दराने नववर्षात ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. पंधराच दिवसात सोन्याने ३४ हजारचा आकडा ओलांडला असून तो ३५ हजारकडे कूच करू लागला आहे. त्यामुळे लग्नाचा हंगाम जवळ आलेला असतानाही सराफी बाजारात शांतता पसरली आहे.जानेवारीच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून सोन्याच्या दराने अचानक उचल खाल्ली. डिसेंबर२०१८मध्ये ३१ हजारपर्यंत असलेले भाव जानेवारीमध्ये ३२ हजारपर्यंत गेले होते. मात्र गेल्या पंधरा दिवसात या भावांमध्ये २ हजारनी वाढ झाली आहे. गेल्या आठवडाभरात हा दर ५० ते १०० रुपयांनी कमी-जास्त होत आहे.
सोन्याचा गुरुवारचा दर हा प्रति १० ग्रॅममागे ३४ हजार ३५० रुपये एवढा होता तर चांदीचा दर हा ४१ हजार १०० रुपये प्रतिकिलो असा होता. सोन्याच्या भावाने अचानक उचल खाल्ल्यामुळे सराफी बाजारावर मात्र मोठा परिणाम झाला आहे. लगीनसराई जवळ असली तरीही सराफी बाजारात सध्या शांतता आहे. लगीनसराईतच सोन्याचे भाव वाढल्याने आता ग्राहकांकडून कितपत खरेदी होईल, याबाबत सुवर्णकारही साशंक झाले आहेत.रत्नागिरीत साधारणपणे मार्चपासून ते मेपर्यंत हा लग्नाचा हंगाम समजला जातो. त्यामुळे फेब्रुवारीपासूनच लगीनघाईला सुरुवात होते. लग्न समारंभात सुरुवातीला सोन्याची खरेदी केली जाते. त्यामुळे फेब्रुवारीपासूनच सोनेखरेदी उसळी घेते. याच काळात सोन्याचे दर वधारले आहेत. गेल्या वर्षी याच काळात सोन्याचे दर हे २९ ते ३० हजार प्रति १० ग्रॅम असे होते. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतच सोन्याचे दर वाढले असून त्यामुळे भारतात सर्वच ठिकाणी हे दर वाढल्याचे काही सुवर्णकारांनी सांगितले.दर वाढण्याची शक्यतासोन्याचे हे दर पुढील काही काळात तेवढेच राहतील, अशी शक्यता सुवर्णकारांनी व्यक्त केली असून मात्र त्यापुढील काळात हे दर कमी होण्याची शक्यता नाहीच; उलट ते आणखीन वाढतील, असे सध्याच्या स्थितीवरून वाटत असल्याचेही सुवर्णकारांनी सांगितले. त्यामुळे हे वर्ष सोने खरेदीदारांसाठी सोन्यासारखे असेल का? याबाबत साशंकता व्यक्त होत आहे.
गेल्या पंधरा दिवसात सोन्याच्या दराने ३४ हजारचा टप्पाही ओलांडला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतच सोन्याचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे त्याचा परिणाम भारतीय बाजारपेठेवर झाला आहे. भविष्यात या दरात फार तफावत होईल, अशी सध्यातरी शक्यता वाटत नाही. या दरवाढीमुळे सराफी व्यवसायावर फार मोठा परिणाम झाला आहे.-मोहीत कारेकर,सुवर्णव्यावसायिक, रत्नागिरी
डॉलर वधारला म्हणून...भारतीय रुपयाच्या तुलनेत अमेरिकन डॉलर जास्त मजबूत झाल्याने भारतीय बाजारपेठेत सोन्याचे दर वधारले आहेत. त्याचबरोबर भारतीय बाजारपेठेत सर्वाधिक सोन्याची खरेदी होते, त्यामुळे सोन्याने एवढी आर्थिक झळाळी घेतल्याचे काही सुवर्णकारांनी सांगितले...तर पुढील वर्षी ४० हजारसध्याची आर्थिक स्थिती पाहता तर अमेरिकन डॉलर व भारतीय रुपया यामधील तफावत अशी कायम राहिल्यास सोन्याचे दर पुढील वर्षात ४० हजारपर्यंत जाऊ शकतात, अशी भीती सुवर्णकारांमधून व्यक्त होत आहे.