रत्नागिरी ,दि. ८ : समाजात डॉक्टरी पेशावर कितीही टीका होत असली तरी रूग्णसेवेसाठी डॉक्टर कुठल्याही क्षणी तत्पर असतो, याची प्रचिती मुंबईहून नागपूरकडे जाणाऱ्या विमानातील प्रवाशांना आली. या विमानात बेशुध्दावस्थेत कोसळलेल्या प्रवाशाला याच विमानातून प्रवास करणारे रत्नागिरीचे बालरोगतज्ज्ञ आणि इंडियन मेडिकल असोसिएशनच्या रत्नागिरी शाखेचे अध्यक्ष डॉ. नीलेश शिंदे यांनी तातडीचे उपचार करून त्यांचे प्राण वाचविले.
वैद्यकीय क्षेत्रातील काही अपप्रवृत्तींमुळे समाजात सरसकट डॉक्टरांना दोष दिला जातो. मात्र, कुठल्याही क्षणी डॉक्टर हा डॉक्टरच असतो. रूग्णसेवेप्रति असलेल्या बांधिलकीची त्याला सदैव जाणीव असते, हे डॉ. नीलेश शिंदे यांनी दाखवून दिले आहे.
डॉ. शिंदे इंडिगो कंपनीच्या विमानाने शनिवारी मुंबईहून नागपूरला जात होते. विमान आकाशात उंच असताना प्रवासाच्या मध्यावर विमानातील एक प्रवासी चालता चालता खाली कोसळला आणि बेशुध्द पडला. परिस्थिती अत्यंत गंभीर होती. विमान उडत असल्याने त्या प्रवाशावर तत्काळ उपचाराची गरज होती.
विमानातील कर्मचाऱ्यांनी अन्य प्रवाशांना आवाहन करताना कुणी डॉक्टर असल्यास पुढे येण्याची विनंती केली. त्याला प्रतिसाद देत रत्नागिरीचे डॉ. नीलेश शिंदे तत्काळ पुढे सरसावले. त्यांनी त्या रूग्णाला तपासले असता त्याचा रक्तदाब कमी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.
तोपर्यं विमानातील एक अन्य डॉक्टर त्यांच्या मदतीला धावले. दोघांनी त्या प्रवाशाला खुर्चीवर बसवून त्याची अन्य तपासणी केली. लिंबूपाणीसह अन्य उपचार करीत त्याला डॉ. शिंदे यांनी शुध्दीवर आणले.
हे करेपर्यंत विमान नागपूर विमानतळावर उतरले होते. त्या रूग्ण प्रवाशाला रूग्णवाहिकेद्वारे तत्काळ रूग्णालयात पाठविण्यात आले. इंडिगोच्या कर्मचाऱ्यांनी डॉ. शिंदे यांचे आभार मानताना त्यांना धन्यवादाचे पत्रही दिले.
डॉक्टरांच्या या सकारात्मक प्रतिसादाचे विमानातील अन्य प्रवाशांनीही कौतुक करताना उभे राहून टाळ्या वाजवत त्यांना मानवंदनाही दिली. हे सारे दृश्य पाहिल्यानंतर रूग्णाची सेवा केलेल्या नीलेश शिंदे यांनादेखील भरून आले.