रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या ५१ व्या आंतर विभागीय नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत रत्नागिरी विभागाच्या ‘किनारा’ नाटकाने प्रथम क्रमांक पटकावला. त्याचबराेबर सर्वाेत्कृष्ट दिग्दर्शन, उत्कृष्ट अभिनय व नेपथ्याचे बक्षीसही पटकावले. ही फेरी वेंगुर्ले येथे आयाेजित करण्यात आली हाेती. या नाटकाची नांदेड येथे ३ जानेवारी राेजी हाेणाऱ्या अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली आहे.वेंगुर्ले केंद्रात रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली व सातारा अशा चार विभागाची चार नाटके झाली. त्यामध्ये जयवंत दळवी लिखित रत्नागिरी विभागाच्या ‘किनारा’ या नाटकाने प्रथम क्रमांक पटकावला. राज्य परिवहन मंडळाच्या नाटकाच्या प्राथमिक फेऱ्या राज्यातील विविध पाच केंद्रावर घेण्यात आल्या. पाचही केंद्रावरुन निवड झालेल्या प्रथम क्रमांकाच्या नाटकांची अंतिम फेरी नांदेड येथे होणार आहे.
या स्पर्धेचे परीक्षण श्यामसुंदर नाडकर्णी, सुरेंद्र उर्फ बाळू खामकर व गीताली महेंद्र मातोंडकर यांनी केले. स्पर्धेचे बक्षीस वितरण राज्य परिवहन सिंधुदुर्ग विभागाचे विभाग नियंत्रण अभिजित पाटील, यंत्र अभियंता प्रशांत वासकर, परीक्षक श्यामसुंदर नाडकर्णी, सुरेंद्र खामकर, गीताली महेंद्र मातोंडकर यांच्या हस्ते करण्यात आले. सहायक यंत्र अभियंता संदीप पाटील यांनी सूत्रसंचालन केले.नाट्यस्पर्धेची ही प्राथमिक फेरी यशस्वी करण्यासाठी राज्य परिवहनचे वरिष्ठ लिपिक पंकज कासार, उपयंत्र अभियंता सुजित डोंगरे, वेंगुर्ले आगार व्यवस्थापक राहुल कुंभार, सहायक यंत्र अभियंता संदीप पाटील यांनी परिश्रम घेतले. रत्नागिरी विभागातील नाटकासाठी वामन जाेग, गणेश जाेशी, अनिकेत आपटे, रामदास माेरे यांनी सहाय केले.
उत्कृष्ट दिग्दर्शन - प्रथम क्रमांक : राजेश मयेकर (रत्नागिरी विभाग, नाटक : किनारा), द्वितीय क्रमांक विजय सूर्यवंशी (सातारा विभाग नाटक- आईबाबा आणि ती).उत्कृष्ट नेपथ्य व रंगमंच व्यवस्था प्रथम : राजू थोरात, सुशील कांबळे, सागर पाटणकर (सातारा विभाग-नाटक आईबाबा आणि ती), द्वितीय क्रमांक : प्रवीण बापर्डेकर, विजय मेस्त्री, रवींद्र तेरवणकर (रत्नागिरी विभाग-नाटक किनारा).उत्कृष्ट अभिनय पुरुष : प्रशांत आडिवरेकर, स्त्री : श्रद्धा मयेकर (रत्नागिरी विभाग-नाटक किनारा).अभिनयासाठी उत्तेजनार्थ पारितोषिके : मारुती तोरबाळे (कोल्हापूर विभाग), संदीप कोळी (सांगली विभाग), अंकुश लोहकर, अनिता शिंदे (सातारा विभाग).