रत्नागिरी : राज्यात पोलिसांवर होणाऱ्या हल्ल्यांचे लोण आता रत्नागिरीतसुध्दा दाखल झाले आहे. मारूती मंदिर येथे अपघाताचा पंचनामा करण्यासाठी गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना मद्यपीने धक्काबुक्की करून अश्लील शिविगाळ केली. याप्रकरणी भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे सदस्य आनंदा गजानन शिंदे यांच्यासह दोघांना शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.राज्यात पोलिसांवर होणाऱ्या हल्ल्यांचा प्रश्न सध्या ऐरणीवर आहे. त्याचे लोण आता रत्नागिरीतही दाखल झाले आहे. शहरातील मारुती मंदिर परिसरात मंगळवारी रात्री १०.५० वाजण्याचा सुमारास भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे सदस्य आनंदा गजानन शिंदे व त्याची मित्रमंडळी सूरज जसलभाई बेगडा, राजेंद्र दत्ताराम चव्हाण (थिबा पॅलेस, रत्नागिरी) हे दारू पिऊन धुंद होते. त्यावेळी भेट मोबाईल शॉपी येथे अपघात झाला.त्याचा पंचनामा करण्यासाठी पोलीस नाईक खेळू ताया सिद हे गेले होते. त्यावेळी त्यांनी या तिघांना रस्त्यावरून बाजूला व्हा, असे सांगितले. त्याचा राग मनात धरून आनंदा शिंदे याने तुम्हाला नोकरी टिकवायची आहे तर येथून निघून जा, असे सांगत दमदाटी केली. मी भ्रष्टाचार निर्मूलन समितीचा पदाधिकारी आहे, असे सांगत सिद यांना धक्काबुक्की करून शिवीगाळ केली.या तिघांनाही सहाय्यक पोलीस निरीक्षक भोये व जाधव यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात तपासणीसाठी नेले असता, सूरज बेगडा यानेही शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यांच्याविरोधात शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अटकेनंतर न्यायालयाने तिघांचीही जामीनावर सुटका केली आहे. (वार्ताहर)
रत्नागिरीत पोलिसाला धक्काबुक्की
By admin | Published: September 07, 2016 11:46 PM