रत्नागिरी : शालेय पोषण आहार वाटपासाठी नव्याने नियुक्त केलेल्या काेल्हापुरातील संस्थेने रा. भा. शिर्के प्रशालेतील विद्यार्थ्यांना चक्क कच्च्या भाताचे वाटप केल्याचा धक्कादायक प्रकार साेमवारी उघडकीला आला. मुलांनी केलेल्या तक्रारीनंतर मुख्याध्यापकांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघड झाल्यानंतर पालिकेच्या शिक्षण मंडळात खळबळ उडाली आहे. या प्रकारामुळे शालेय पोषण आहाराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.यापूर्वी शासनाकडून शाळांना धान्य पुरवठा केला जात हाेता. त्यानंतर शाळेने नेमलेल्या बचत गटाकडून विद्यार्थ्यांना आहार दिला जात हाेता. नव्या शैक्षणिक वर्षापासून आहाराचे वाटप बचत गटाकडून काढून निविदा प्रक्रियेद्वारे परजिल्ह्यातील तीन संस्थांना ठेका देण्यात आला आहे. रत्नागिरी नगर पालिका व पालिका शिक्षण मंडळ यांच्यामार्फत ही प्रक्रिया राबविण्यात आली.नव्या संस्थांमार्फत १ ऑगस्टपासून पोषण आहार पुरवठ्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली. पहिल्याच दिवशी शहरातील रा. भा. शिर्के प्रशालेत पाेषण आहार पुरवठा करणाऱ्या काेल्हापूर येथील संस्कार महिला मंडळ या संस्थेने कच्चा भात विद्यार्थ्यांना वाढला, तर विद्यार्थ्यांना वाटप केलेल्या भातात केसही आढळले. विद्यार्थ्यांनी याची माहिती मुख्याध्यापकांना दिल्यानंतर पोषण आहारचे वाटप तत्काळ थांबविण्याची सूचना केली.या प्रकाराबाबत माहिती मिळताच शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी सुनील पाटील यांनी तत्काळ शाळेला भेट देऊन दुसऱ्या संस्थेकडून पोषण आहार मागविला आणि त्यानंतर पुन्हा आहाराचे वाटप सुरू झाले. मात्र, मुलांना तब्बल तासभर आहाराशिवायच राहावे लागले, तर शैक्षणिक तासिकेतील दोन तास वाया गेले. त्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.
विद्यार्थ्यांनी धुतली ताटंसंस्थांना ठेका देताना पोषण आहाराची ताटं संस्थेने आपल्या कर्मचाऱ्यांमार्फत स्वच्छ करण्याची अट आहे. मात्र, संस्थेने विद्यार्थ्यांनाच त्यांची ताटं स्वच्छ करायला लावल्याचा प्रकारही पुढे आला.
पोषण आहारात विद्यार्थ्यांना कच्चा भात पुरवला, वरणाला चव नव्हती ही वस्तुस्थिती आहे. आपण स्वत: शाळेतील पोषण आहाराची तपासणी केली आहे. शाळेचा अहवाल आल्यानंतर संस्थेला लेखी स्वरूपात नोटीस दिली जाणार आहे. - सुनील पाटील, प्रशासन अधिकारी, शिक्षण मंडळ, रत्नागिरी.
सुरुवातीला आहार घेतलेल्या सुमारे शंभर विद्यार्थ्यांनी भात कच्चा असल्याची तक्रार केल्यानंतर आम्ही खातरजमा केली. मी आहार पुरवठा बंद करून याची माहिती पालिकेच्या प्रशासन अधिकाऱ्यांना दिली. या आहारामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. - रमेश चव्हाण, प्रभारी मुख्याध्यापक, रा. भा. शिर्के प्रशाला.