राजापूर : दोन मतदान केंद्रांवरील मतमोजणीबाबत आपण आक्षेप नोंदवला असल्याची माहिती राजापूर मतदारसंघातील उद्धवसेनेचे उमेदवार राजन साळवी यांनी दिली. याबाबत त्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना आपल्या आक्षेपाचे निवेदन दिले आहे.राजापूर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीचा निकाल दि. २३ नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात आला. त्यातील निकालाबाबत आपल्याला संशय वाटत असल्याचे राजन साळवी यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या २६ एप्रिल २०२४ च्या आदेशानुसार निवडणूक निकाल लागल्यानंतरही ७ दिवसाच्या आत ईव्हीएम व व्हीव्हीपॅटच्या पडताळणीची मागणी दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकाचे उमेदवार करु शकतात. त्या आधारे निवडणूक प्रक्रिया व मतमोजणी प्रक्रिया संशयास्पद वाटत असल्याने मतदान केंद्र क्रमांक २ - चाफवली व केंद्र क्रमांक २०० - तुळसवडेचे ईव्हीएम मायक्रो कंट्रोलर व व्हीव्हीपॅटची पडताळणी करुन निर्माण झालेला संशय दूर करावा, असे राजन साळवी यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे.
राजापूर मतदारसंघातील दोन केंद्रांची मतमोजणी पुन्हा करा, राजन साळवी यांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2024 7:11 PM