गुहागर : मराठीतील भाषा, साहित्य, संस्कृती व वाचन चळवळ जोपासण्याचे महत्त्वपूर्ण काम हे वाचनालयाच्या माध्यमातून होत असते. वाचन संस्कृती टिकवण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी वाचनालयांच्या पाठीशी उभे राहिजे पाहिजे, असे आवाहन डॉ. तानाजीराव चोरगे यांनी केले.
ज्ञानरश्मी वाचनालयाच्या सभागृहाला डॉ. तानाजीराव चोरगे यांचे नाव देण्यात आले आहे. यानिमित्त वाचनालयाला सदिच्छा देत संचालक मंडळाने आभार मानले. यावेळी ते बोलत होते. चोरगे म्हणाले, गुहागरचा सांस्कृतिक व साहित्यिक वारसा जोपासणारे ज्ञानरश्मी वाचनालय वाचन संस्कृती जोपासण्यासाठी राबवत असलेल्या विविध उपक्रमांचे कौतुक करुन भविष्यातील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी जगभरातील साहित्यिकांचे व वाचकांचे हक्काचे व्यासपीठ असणाऱ्या साहित्य कस्तुरी या मासिकाच्या व साहित्यिक संस्थेच्या बोधचिन्हाचे डॉ. तानाजीराव चोरगे व प्रकाश देशपांडे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.
यावेळी मराठी साहित्य परिषदेचे कोकण विभागीय समन्वयक प्रकाश देशपांडे, रत्नागिरी जिल्हा बँकेचे संचालक डॉ. अनिल जोशी, ज्ञानरश्मी वाचनालयाचे अध्यक्ष राजेंद्र आरेकर, संचालक अरुणा पाटील, अशोक आठवले, सुप्रिया बारटक्के, संजय मालप, अॅड. संकेत साळवी, बाबासाहेब राशिनकर, ज्ञानेश्वर झगडे, प्रभुनाथ देवळेकर, सोनाली घाडे, शामली घाडे, अश्विनी जोशी उपस्थित होते.