सुभाष कदम :- चिपळूणयावर्षी पावसाने गुंगारा दिल्याने शेतकऱ्यासह पर्यटकांच्या तोंडचे पाणी पळाले होते. तब्बल महिनाभर उशिरा पाऊस सुरु झाला आणि आता तो गेल्या आठवड्यापासून बऱ्यापैकी स्थिरावला आहे. त्यामुळे पर्यटकांचे खास आकर्षण असलेला मुंबई-गोवा महामार्गावरील सवतसडा धबधबा फेसाळणाऱ्या पांढऱ्याशुभ्र धारांनी पर्यटकांना साद घालत आहे. गेल्या आठवड्यापासून चिपळूण परिसरात समाधानकारक पाऊस पडत आहे. आतापर्यंत तालुक्यात १ हजार मिलिमीटर पाऊस पडला आहे. नद्या, नाले ओसंडून वाहू लागले आहेत. डोंगराळ भागातून अनेक झरे धबधब्याच्या रुपाने उसळी मारुन वर आले आहेत. त्यांचे निथळ स्वच्छ, पांढरे शुभ्र पाणी महामार्गावरुन प्रवास करणाऱ्या पर्यटकांचे खास आकर्षण ठरते. कशेडी घाट सोडला, तर चिपळूणपर्यंत पर्यटकांना मोठा धबधबा पाहावयास मिळत नाही. त्यामुळे चिपळूणचा सवतसडा धबधबा पर्यटकांचे खास आकर्षण असते. सुरुवातीच्या काळात पाऊस कमी असल्याने पर्यटकांचा हिरमोड झाला होता. पण, आता पाऊस स्थिरावला आहे. हिरवाईत दाट धुक्याबरोबर बदलणाऱ्या वातावरणाने रिमझिम पावसात चिंब भिजण्याचा आनंद आता पर्यटकांना घेता येणार आहे. कड्यावरुन वेगाने कोसळणारा धबधबा आता ओसंडून वाहात आहे. त्याचा प्रचंड आवाज, पाण्याची खळखळ आणि त्यावर मस्ती करणारे पर्यटक हा एक अवर्णनीय क्षण असतो. आता पावसाळी हंगाम सुरु झाल्याने सवतसडा धबधबा ओसंडून वाहत आहे. तो पाहण्यासाठी महामार्गावरील असंख्य पर्यटक येथे थांबतात. उत्साही पर्यटकांची येथे गर्दी उसळते. महाविद्यालयीन विद्यार्थीही मोठ्या संख्येने येथे येतात. या ठिकाणची माहिती देणारा फलक सह्याद्री विकास समितीतर्फे लावण्यात आला आहे. वन खात्याच्या सहकार्याने लावलेल्या या फलकावर आवश्यक त्या सूचना लिहिल्या आहेत. तथापि, विक एण्डच्या मस्तीत असलेल्या अनेक पर्यटकांचे या फलकाकडे दुर्लक्ष होते. काहीजण हा फलक बघून न बघितल्यासारखे करतात आणि पाण्यात उतरतात. त्यामुळे धोका संभवतो. महामार्गापासून धबधब्याकडे जाण्यासाठी जांभ्या दगडाची आकर्षक पाखाडी आहे. त्यामुळे हा प्रवास सुखाचा होतो. अनेक प्रेमीयुगुलांकडून झाडाझुडपांचा आधार घेऊन मौजमस्ती सुरू असते. सवतसडा जेथे कोसळतो तेथे जाणे अत्यंत अवघड आहे. येथे जाणे अनेक वेळा जीवघेणे ठरु शकते. त्यामुळे पाण्याजवळ मस्ती करणे, पाण्याच्या धबधब्याखाली उभे राहून फोटोसेशन करणे महागात पडू शकते. आपली हौस भागवताना पुरेशी काळजी घ्यायला हवी. धबधब्याच्या ठिकाणी लहान मोठे व्यवसाय चालत आहेत. त्यांच्याही रोजीरोटीचा प्रश्न यामुळे सुटतो आहे. येथे गरमागरम मक्याची कणसं पावसाच्या गारव्यातही उबदारपणा देऊन जातात. मनमुराद आनंद लुटण्यासाठी आणि पावसाचा आस्वाद घेण्यासाठी एकदा तरी सवतसड्यावर जावे.मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या सवतसडा धबधब्याची ख्याती सर्वदूर आहे. त्याला ऐतिहासिक वारसा आहे. दोन सवतींची त्यामागे पार्श्वभूमी आहे. एकदा भेट देऊन आनंद लुटण्याबरोबरच येथील दंतकथा जाणून घेणेही महत्त्वाचे आहे.-कशेडी घाटानंतर धबधब्याचे दर्शन होते दुर्लभ.-सवतसडा धबधब्याकडे हळूहळू पर्यटकांचा वाढतोय ओढा.-गरमागरम मक्याची कणसं खाण्यासाठी होतेय गर्दी.-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा भरणा अधिक.
सवतसड्याची पर्यटकांना साद
By admin | Published: July 16, 2014 10:36 PM