लाेकमत न्यूज नेटवर्क
दापोली : पंचायत समिती दापोली शिक्षण विभागातर्फे विस्तार अधिकारी विजय बाईत यांच्या अध्यक्षतेखाली पालगड प्रभागातील गुणवंत विद्यार्थ्यांसह मार्गदर्शक शिक्षकांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी गतवर्षी शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत यश प्राप्त केलेल्या आवाशीचा यशराज पाटील आणि विसापूर खातलोली शाळेची वेदश्री सुर्वे यांच्यासह मार्गदर्शक शिक्षक, सेवानिवृत्त शिक्षक अनंत शिंदे, आदर्श पुरस्कार प्राप्त गणेश तांबिटकर यांचा सत्कार करण्यात आला. गतवर्षाच्या तुलनेत या शैक्षणिक वर्षात पालगड प्रभागात गुणवत्ताधारक विद्यार्थी संख्या वाढली पाहिजे. यादृष्टीने सर्वांनी जोरदार काम करूया. व्हिजन दापोलीच्या सराव प्रश्नपत्रिकांसोबत आपल्या प्रभागातून प्रभागस्तरीय सराव परीक्षेवर जोर देऊन याहीवर्षी पालगड प्रभागातील विद्यार्थी गुणवत्ताधारक कसे बनतील, तसेच सर्व शाळांचा १०० टक्के निकाल लागेल यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे विस्तार अधिकारी विजय बाईत यांनी सांगितले.
यावेळी कादिवली केंद्रप्रमुख शीतल गिम्हवणेकर, जामगे उर्दूचे केंद्रप्रमुख अश्फाक पाते, पालगडचे केंद्रप्रमुख संतोष आयरे उपस्थित हाेते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अश्फाक पाते यांनी केले. शिरसाडी शाळेचे मुख्याध्यापक सुधाकर गायकवाड यांनी आभार मानले. सूत्रसंचालन चिंचाळी शाळेतील पदवीधर शिक्षक बाबू आग्रे यांनी केले. कार्यक्रम यशस्वितेसाठी श्रीराम महाडिक, सुधाकर गायकवाड, जामगे उर्दू केंद्रातील सर्व शिक्षकांनी प्रयत्न केले.