लांजा : तालुक्यातील कोरोना रुग्णसंख्येचे आजवरचे रेकॉर्ड मोडत बुधवारी नवा विक्रम नोंदवला गेला. २४ तासांत तब्बल ६७ कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. मंगळवारी एका प्रौढ महिलेचा बळी गेला आहे.
कोरोना दाखल झाल्यापासून प्रथमच तालुक्यात इतक्या मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडले आहेत. आरटीपीसीआर चाचणीत ४१, तर ॲन्टिजेन चाचणीत २६ असे एकूण ६७ जण कोरोना चाचणीत पाॅझिटिव्ह आले आहेत. आंजणारी येथील एकाच गावातील कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या २६ जणांचे आरटीपीसीआर अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत. मंगळवारी लांजा येथील एका कोरोनाबाधित प्रौढ महिलेचा रत्नागिरी येथे उपचारासाठी जात असतानाच बळी गेला आहे.
तालुक्यातील कोरोनाची एकूण रुग्ण संख्या ८८१ झाली आहे. यातील ६९० रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. २२ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. सध्या तालुक्यात १६९ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.