खेड : तालुक्यात यंदा पावसाचे प्रमाण चांगले असून गतवर्षीच्या तुलनेत दुप्पटीपेक्षा जास्त पावसाची नोंद या महिन्यात झाली आहे. या महिन्यात तालुक्यात १,११९.३ मिलीमीटर इतका पाऊस नोंदविला गेला आहे. गेल्यावर्षी ४६४.१२ मिलीमीटर इतका पाऊस झाला होता.
उक्षीत लसीकरण मोहीम
रत्नागिरी : तालुक्यातील उक्षी येथील ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद आरोग्य सभापती उदय बने यांच्या सहकार्याने तसेच सरपंच किरण जाधव यांच्या सहकार्याने कोविशील्डसाठी लसीकरण मोहीम आयोजित केली होती. यावेळी ७२ ग्रामस्थांना या डोसचा लाभ देण्यात आला. यावेळी उपसरपंच नागवेकर, अन्वर गोलंदाज उपस्थित होते.
अलगीकरण कक्ष सुरू
दापोली : तालुक्यातील पालगड ग्रामपंचायतीमार्फत कोविड रुग्णांसाठी अलगीकरण कक्ष तयार करण्यात आला आहे. या कक्षासाठी माजी आमदार संजय कदम यांच्याकडून दहा बेड, गादी, उशी, सॅनिटायझर कॅन, पीपीई किट, वाफेचे मशीन आदी साहित्य देण्यात आले आहे. सरपंच अनिल बेलोसे यांच्याकडे हे साहित्य सुपूर्द करण्यात आले.
ग्रामविकास रखडला
रत्नागिरी : कोरोना महामारीमुळे गेल्या वर्षभरापासून ग्रामसभा स्थगित ठेवण्यात आली आहे. ग्रामविकास संबंधित महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याचे अधिकार ग्रामसभांना देण्यात आले आहेत. मात्र, गेल्या वर्षभरात एकही ग्रामसभा अनेक ग्रामपंचायतीत झालेली नाहीत. त्यामुळे गावविकास संबंधीचे महत्त्वपूर्ण निर्णय झालेले नाहीत.
मोफत नेत्रतपासणी शिबिर
रत्नागिरी : इन्फिगो आयकेअर हॉस्पिटल आणि रत्नागिरी बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने फक्त वकिलांसाठी मोफत नेत्रतपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. २३ जून ते ७ जुलै या कालावधीत हे शिबिर आयोजित केले असून इन्फिगो हॉस्पिटल येथे सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत सुरू राहणार आहे.