लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : तालुक्यातील नेवरे गावातील संजय हर्षे यांना शेतीची आवड असल्याने शेतीमध्ये नवनवीन प्रयोग ते सातत्याने करीत असतात. आंबा, नारळ, सुपारी बागायतीतून उत्पन्न घेत असताना बारमाही शेती ते करीत आहेत. कोकणच्या लाल मातीत भुईमुगाचे विक्रमी उत्पादन घेता येत असल्याने हर्षे यांनी सिद्ध केले आहे.
पावसाळ्यात भात पिकाचे उत्पादन घेतल्यानंतर जमीन मोकळी ठेवण्यापेक्षा वेगवेगळी पिके ते घेत असतात. कुळीथ, पावटा, चवळी, काकडी, कलिंगड, उडीद, टोमॅटो, हळद तसेच भुईमूग लागवड करीत आहेत. सेंद्रिय पद्धतीने उत्पादन ते घेत असून उत्पादनाचा दर्जाही चांगला आहे.
शेतीसाठी यांत्रिक अवजारांचा वापर करतानाच आधुनिक तंत्राचा वापर अधिक उत्पन्न घेण्यासाठी करीत आहेत. प्रत्येक पीक लागवडीपूर्वी बियाणे, रोपांची निवड, लागवड पद्धती, खताची मात्रा, कीटकनाशक फवारणी, बेनणी, पाण्याची मात्रा याबाबत योग्य नियोजन करतात. हवामानातील बदलाचा पिकावर परिणाम होत असल्याने तालुका कृषी कार्यालयाकडून मार्गदर्शन घेत आहेत. भुईमूग लागवडीसाठी त्यांनी ‘कोकण भूरत्न’ या विद्यापीठ मान्यताप्राप्त वाणाची निवड केली. २० किलो बियाणे लागवडीतून त्यांना ९२० किलो भुईमुगाचे उत्पन्न मिळाले आहे. भुईमुगाचा दर्जा तसेच भरघोस उत्पन्न मिळविण्यात ते यशस्वी ठरले आहेत.
जनावरांसाठी मका
शेतीला जोड म्हणून त्यांनी दुभत्या जनावरांचे पालन केले आहे. सेंद्रिय शेतीसाठी शेणखताचा वापर होतो. मात्र, दुभत्या जनावरांना पोषक खाद्य आवश्यक असते. त्यामुळे त्यांनी मका लागवड केली आहे. भाजीपाला लागवडीमुळे ओला चारा उपलब्ध असला तरी मकामुळे गुरांना पौष्टिक खाद्य उपलब्ध होत आहे. दुधाची मात्रा चांगली असून दर्जाही उत्तम राखण्यात यशस्वी ठरले आहेत.
बारमाही भाजीपाला
आंबा, नारळ, सुपारीतून उत्पन्न मिळवत असतानाच बारमाही भाजीपाला उत्पादन घेण्यात हर्षे यशस्वी ठरले आहेत. प्रत्येकी तीन गुंठ्यांवर हळद, उडीद, कुळीथ, पावटा, लाल व पांढरी चवळी, कलिंगड, काकडी, टोमॅटोचे उत्पादन घेत आहेत. विक्रीसाठी शहराकडे धाव घेण्यापेक्षा गावातच विक्री होत आहे. याशिवाय पालेभाज्यांचे भरघोस उत्पादन ते घेत आहेत.
कोकणच्या लाल मातीत विविध प्रकारची उत्पादने घेता येतात. मात्र, त्यासाठी योग्य मार्गदर्शन, तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक आहे. कमी श्रमासाठी आधुनिक अवजारे, तर पाण्याचा अपव्यय होऊ नये यासाठी तुषार सिंचन गरजेचे आहे. लागवड करण्यासाठी वाणाची निवड महत्त्वपूर्ण असून हवामानातील बदलाचा परिणाम पिकावर होत असल्याने लक्ष ठेवणे गरजेचे आहे. गांडूळ व शेणखताचा वापर करीत आहे.
- संजय हर्षे, शेतकरी, नेवरे.