रत्नागिरी : जेएसडब्ल्यू पुरस्कृत रिळ येथील प्रगतशील शेतकरी मिलिंद वैद्य यांनी सगुणा पद्धतीने भात लागवड करुन यार्षीच्या खरीप हंगामात भाताचे हेक्टरी १९.२४ टन इतके विक्रमी उत्पादन घेतले आहे. भात उत्पादनामध्ये जागतिक विक्रमाची नोंद चीनमधील शेतकऱ्याची १९.४० टन हेक्टरी इतकी असून, मिलिंद वैद्य यांनी जागतिक विक्रमाच्या जवळ पोहोचण्यात यश मिळवले आहे. एकीकडे नैसर्गिक आपत्ती आणि मजुरांअभावी कोकणातील भातशेती परवडत नाही, अशी ओरड असताना या शेतकऱ्याने कोकणातील शेतकऱ्यांना एक आदर्श घालून दिला आहे. याअगोदर वैद्य यांनी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागांतर्गत भातपीक स्पर्धेत भाग घेऊन राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. पुढच्या वर्षी जागतिक विक्रम मोडीत काढण्याचा मानस त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. मिलिंद वैद्य यांच्या भातशेतीला परिसरातील शेतकरी, विभागीय कृषी सहसंचालक अशोक लोखंडे, एसआरटीचे जनक कृषिभूषण चंद्रशेखर भडसावळे, जेएसडब्ल्यूचे वरिष्ठ अधिकारी यांनी भेटी देऊन पाहणी केली. सगुणा पद्धतीने भात लागवडीमध्ये फक्त पहिल्या वर्षी गादीवाफे बनवण्यासाठी नांगरट करावी लागते. एकदा गादीवाफे बनवल्यानंतर कमीत कमी दहा वर्षेतरी नंतर नांगरणीची गरज नसते. या पद्धतीमध्ये रोप काढणे, भाजावळ करणे, पुनर्लागवड, चिखलणी, फोड, बेर करावी लागत नसल्याने मशागतीवर होणाऱ्या खर्चात ५० टक्के बचत होते. खतामध्ये ५० टक्के बचत होते. पावसाने ओढ दिल्यास उत्पादनावर जास्त परिणाम होत नाही. त्यामुळे कोकणातील शेतकऱ्यांसाठी एसआरटी पद्धत एक वरदान असून, जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन मिलिंद वैद्य यांनी केले. भातपिकाबरोबरच शेतकरी ही द्वीपिकी, तीनपिकी शेती घेण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याबरोबरच रब्बीमध्ये शेतकऱ्यांना सुधारित जातीचे भाजीपाला बियाणे पुरवण्यात येते. मिलिंद वैद्य यांनी भाताचे विक्रमी उत्पन्न घेतल्याबद्दल जेएसडब्ल्यू एनर्जीचे युनिट हेड विजय परांजपे, युनिट इनचार्ज यतीश छाब्रा, सीएसआर विभागप्रमुख सुधीर तेलंग, विभागीय कृषी सहसंचालक डॉ. अशोक लोखंडे, कृषिभूषण चंद्रशेखर भडसावळे यांनी अभिनंदन केले. पुढच्या वर्षी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या पद्धतीने भात लागवड करण्यासाठी जेएसडब्ल्यूचे अधिकारी, कृषी विभागाचे अधिकारी व रत्नागिरी पंचायत समितीचे कृषी अधिकारी प्रयत्न करत आहेत. (प्रतिनिधी)
शेतकऱ्याने घेतले भाताचे विक्रमी उत्पादन
By admin | Published: October 24, 2016 12:13 AM