रत्नागिरी : हॉटेल व्यवसायाला पूर्ण परवानगी मिळण्यासाठी जिल्ह्यातील हॉटेल व्यावसायिकांनी रविवारी पर्यटन दिनी हॉटेल्सवर लाल झेंडा फडकविला. याद्वारे शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला असून, हॉटेल व्यवसायाला पूर्ण परवानगी मिळेपर्यंत हा झेंडा हॉटेल्सच्या बाहेर फडकत ठेवण्यात येणार आहे.हॉटेल असोसिएशनचे सचिव सुनील देसाई, रवींद्र घोसाळकर, उदय लोध यांच्या नेतृत्त्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. रत्नागिरीतील हॉटेल अलंकार येथे सुनील देसाई, हॉटेल सफारी येथे यश राणे यांनी झेंडा फडकविला. या वर्षभरात जिल्ह्यातील पर्यटन व्यावसायिक नष्ट होण्याच्या स्थितीत आहेत.
दिवाळीमध्ये क्यार वादळ, डिसेंबरमध्ये वादळसदृश स्थिती व कोरोनामुळे जिल्ह्यातील पर्यटन व्यवसाय कोलमडला असल्याचे हॉटेल व्यावसायिकांनी सांगितले. होम स्टे, हॉटेल, लॉजिंग, बोटिंग, वॉटर स्पोर्ट, स्कुबा डायव्हिंग, गाईड, टुरिस्ट व्हेईकल या व्यावसायिकांची आर्थिक स्थिती दयनीय आहे. व्यावसायिकांकडे शासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.रत्नागिरी जिल्हा काही प्रमाणात पर्यटनावर आधारित आहे. स्थानिक व्यावसायिकांनी कोणतीही सरकारी मदत किंवा कुठलेही अनुदान न घेता आपले व्यवसाय उभे केले आहेत. अन्य व्यवसायांना शासनाने परवानगी दिलेली आहे. मात्र, हॉटेल व्यवसायाला पूर्ण परवानगी मिळालेली नाही. ही परवानगी मिळण्यासाठी हॉटेल्सबाहेर लाल झेंडा फडकविण्यात आला.
या आंदोलनाचा मुख्य उद्देश शासनाचा निषेध करण्याचा नाही. सरकारने या व्यावसायिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी हालचाल करावी व व्यावसायिकांना दिलासा द्यावा, यासाठी हे आंदोलन करण्यात आले. ज्यांना आंदोलनाची भूमिका पटली आहे त्यांनी स्वेच्छेने हॉटेल्सबाहेर झेंडा फडकवावा. त्यासाठी कोणावरही बंधन नव्हते.- सुनील देसाई, सचिव, हॉटेल असोसिएशन.