राजापूर : एकजुट दाखवून शासनाला रिफायनरी प्रकल्प रद्द करायला भाग पाडणाऱ्या कोकण रिफायनरी प्रकल्प विरोधी संघर्ष संघटनेने राजकीय आखाड्यात उतरण्याचे संकेत दिले असून यापुढे कोकण शक्ती महासंघ या नावाने ओळखली जाणारी नवीन संघटना राजकीय, सामाजिक, आर्थिक क्षेत्रात काम करणार असून आगामी विधानसभा निवडणुकीत जो राजकीय पक्ष या संघटनेच्या उमेदवाराला पाठींबा देईल, त्यालाच लोकसभेच्या निवडणुकीत मतदान करु अशी रोखठोक भूमिका कोकण शक्ती महासंघाचे अध्यक्ष अशोक वालम यांनी जाहीर केलीमागील दोन वर्षांपासून नाणार प्रकल्पाविरोधात जोरदार आंदोलने सुरु होती. ही आंदोलने कोकण रिफायनरी प्रकल्प विरोधी संघर्ष संघटनेच्या माध्यमातून लढली गेली होती व त्याचे नेतृत्व अशोक वालम यांनी केले होते.
रिफायनरी प्रकल्प रद्द व्हावा म्हणून या संघटनेने भाजपवगळता शिवसेना, काँग्रेस, मनसे, महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष, राष्ट्रवादी आदी पक्षांच्या प्रमुखांशी भेट घेवून प्रकल्प रद्द करण्यासाठी पाठिंबा द्यावा, अशी विनंती केली होती.प्रकल्पाला असलेला विरोध लक्षात घेवून शासनाने काही दिवसांपूर्वी प्रकल्पाची अधिसुचना रद्द केली होती. नाणार परिसरातील जनतेच्या एकसंघतेमुळेच प्रकल्प रद्द झाल्याने कोकण रिफायनरी प्रकल्पविरोधी संघर्ष संघटनेच्या दोन दिवसांचा महाविजयोत्सव साजरा करण्यात आला. या दरम्यान अशोक वालम पुढील राजकीय भूमिका जाहीर करतील अशी चर्चा सोशल मिडीयावरुन सुरु असल्याने नक्की कोणती भुमिका घेतली जाते, याकडे सर्वांचे लक्ष होते.प्रकल्प हटविण्यासाठी लढणाऱ्या जनतेला अनेक पक्षांचे पाठबळ लाभले होते. त्यामुळे प्रकल्पग्रस्त आपल्यालाच पाठिंबा देतील अशी अटकळ काही पक्षांची होती. त्या पार्श्वभूमीवर पुढील राजकीय भूमिका अशोक वालम यांनी जाहीर केली आहे. मागील दोन वर्षे कार्यरत असलेली कोकण रिफायनरी प्रकल्पविरोधी संघर्ष संघटना हे नाव बदलून यापुढे कोकण शक्ती महासंघ या नावाने संघटना कार्य करणार असल्याचे वालम यांनी सांगितले.