राजापूर : तालुक्यात बारसू, सोलगाव, गोवळ परिसरात प्रस्तावित असलेला रिफायनरी प्रकल्प मार्गी लावावा, यासाठी तालुक्यातील विविध रिफायनरी समर्थक संघटनांचे पदाधिकारी बुधवारी राजापुरात केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांची भेट घेणार आहेत, अशी माहिती रिफायनरी प्रकल्प समर्थन समन्वय समितीचे अध्यक्ष ॲड. शशिकांत सुतार यांनी पत्रकारांना दिली.
ॲड. शशिकांत सुतार यांनी सांगितले की, नारायण राणे यांच्याकडे केंद्रीय लघु, सूक्ष्म व मध्यम उद्योग खाते असल्याने त्याचा फायदा कोकणाला होणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून या मंत्रालयाशी निगडीत अन्य पूरक उद्योग, व्यवसाय राजापूर तालुक्यात यावेत आणि बेरोजगार तरूण-तरूणी, महिला बचतगट, छोटे व्यावसायिक यांना रोजगाराची संधी निर्माण व्हावी, अशी मागणी सर्व समर्थक संघटना करणार असल्याचे ॲड. सुतार यांनी सांगितले. बुधवार, २५ ऑगस्ट रोजी दुपारी २.३० वाजता नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा राजापुरात येत असून, एस. टी. डेपोसमाेर होणाऱ्या स्वागत समारंभानंतर राणे हे तालुक्यातील विविध संघटनांशी संवाद साधणार आहेत. यावेळी त्यांची भेट घेऊन प्रकल्पाच्या अमलबजावणीचे एक निवेदन समर्थक संघटनांतर्फे देण्यात येणार असल्याचे सुतार यांनी सांगितले.
बारसू परिसरात एकही विस्थापन नसून, या परिसरात प्रकल्पासाठी पुरेशी जागा उपलब्ध आहे. स्थानिकांचाही प्रकल्पाला पाठिंबा असून, अनेक ग्रामपंचायतींनीही सहमती दर्शवत ठराव पारित केले आहेत. याच परिसरात एमआयडीसी प्रस्तावित असून, त्याच्या जोडीला हा प्रकल्प या परिसरात झाला तर विकासाला गती येणार आहे. तालुक्यातील ५५ विविध सामाजिक संघटना असलेल्या रिफायनरी समर्थक समन्वय समितीसह बारसू, सोलगाव, गोवळ पंचक्रोशी, दशक्रोशीतील समर्थक संघटनांचे पदाधिकारी बुधवारी राणे यांची भेट घेणार असल्याचे ॲड. सुतार यांनी सांगितले.