राजापूर : रिफायनरी प्रकल्पासाठी साडेआठ हजार एकर जमिनींची संमत्तीपत्रे देण्यात आल्याने तो प्रकल्प मूळ जागेवरच मार्गी लागला पाहिजे. यापूर्वी राज्यसभा सदस्य नारायण राणे यांच्या प्रयत्नाने अणुऊर्जा प्रकल्प मार्गी लागला होता. तशाच पध्दतीने रिफायनरी प्रकल्पही नारायण राणेच मार्गी लावू शकतील, असा आमचा ठाम विश्वास आहे. लवकरच त्यांची भेट घेणार असल्याची माहिती राजापूर तालुका प्रकल्प समन्वय समितीचे अध्यक्ष अनिलकुमार करंगुटकर यांनी पत्रकारांना दिली.
ऱाजापूर तालुक्यातील नाणार परिसरात प्रस्तावित असलेल्या रिफायनरी प्रकल्पासाठी सुमारे साडेआठ हजार एकर जमिनींची संमत्तीपत्रे स्थानिक शेतकऱ्यांनी यापूर्वीच दिली आहेत. या प्रकल्पाची जागा ही पेट्रोलियम कंपनीच्या समितीने प्रत्यक्ष जागेवर येऊन पाहणी केल्यावरच निवडली आहे. शिवाय आवश्यक त्या तांत्रिक बाजूही प्रकल्पासाठी या परिसरात आहेत. त्यामुळे रिफायनरी प्रकल्प नाणारमध्ये व्हावा, अशी जोरदार मागणी अनिलकुमार करंगुटकर यांनी केली आहे. सुमारे साडेतीन लाख कोटींच्या या प्रस्तावित प्रकल्पामुळे राजापूर तालुक्याचा कायापालट तर होईलच शिवाय तालुक्याचा विकास जोमाने होईल, असे अनिलकुमार करंगुटकर यांनी सांगितले.
ते म्हणाले की, फेब्रुवारी २०१९मध्ये राजापूर तालुका प्रकल्प समन्वय समितीने प्रकल्प समर्थकांचा मेळावा घेतला होता. भाजपचे मुख्य प्रवक्ते माधव भंडारी यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेटही घेतल्याची आठवण करंगुटकर यांनी करुन दिली. तालुक्यात पहिल्यांदा आलेला अणुऊर्जा प्रकल्प भाजपचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांच्या प्रयत्नांमुळे मार्गी लागला होता. तशाचप्रकारे रिफायनरी प्रकल्पही ते मार्गी लावतील, असे अनिलकुमार करंगुटकर यांनी पत्रकारांना सांगितले.